सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णु नागले यांना पोलीस पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णु गोपाळ नागले यांना उल्लेखनीय सेवेबद्दल हिंदुस्थान सरकारकडून “पोलीस पदक” जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या पदकाकरीता एकुण 3 वरिष्ठ अधिकारी व 1 पोलीस कर्मचारी यांची निवड करण्यात आलेली असून त्यापैकी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागले यांची निवड झालेली आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागले हे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये दिनांक १९८३ मध्ये भरती झालेले असून त्यांनी यापुर्वी पोलीस मुख्यालय, देवरुख पोलीस ठाणे, लांजा पोलीस ठाणे, संगमेश्वर पोलीस ठाणे या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडलेले आहे. सध्या ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी काम केलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अतिशय चांगल्या प्रकारे कार्यालयीन कामकाज केले असून क्राईम रायटर म्हणूनही प्रशंसनीय काम केलेले आहे. त्यांचे कार्यकाळामध्ये त्यांनी पोलीस ठाण्यातील गुन्हे अभिलेख उत्तमप्रकारे व आपले सुवाच्छ अक्षरामध्ये ठेवून वेळोवेळी मुदतीत अदयावत केलेले आहेत. या शिवाय त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हे शोध, गोपनीय माहीती संकलन, समाजविघातक घटकांविरुध्दची कारवाई, अति महत्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त याबाबतीत उत्कृष्ठ प्रकारे मदत केलेली आहे. त्यांचा जनता संपर्क अतिशय चांगला असून कर्तव्याप्रती उत्कृष्ठ निष्ठा असलेले नागले यांनी आपल्या प्रदीर्घ 35 वर्षाच्या सेवाकालावधीमध्ये कठोर मेहनत घेवून आपले कर्तव्य पार पाडलेले आहे. त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेवून यापुर्वी त्यांना सन 2011 मध्ये गुणवत्तापुर्व सेवेबद्दल राष्ट्रपती यांचेकडून “पोलीस पदक” व सन 2012 मध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून “सन्मानचिन्ह” देवून गौरविण्यात आलेले आहे. श्री.नागले यांनी आपले पोलीस दलातील कर्तव्यकाळामध्ये चांगले कामगिरीकामी एकुण 257 बक्षीसे प्राप्त केलेली आहेत.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागले यांचे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (गृह) महादेव वावळे, शिरीष सासने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्यासह जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.