
पानटपरीमध्ये गुटखा मटेरिअलची विक्री सुरू करू देण्यासाठी व त्यावर कार्यवाही न करण्यासाठी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडून 2 हजार रुपयांची मागणी केली. ही लाच प्रत्यक्षात स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी धनंजय ज्ञानोबा गुणाले यांनी तक्रारदार यांना पानटपरीमधून गुटखा मटेरिअलची विक्री चालू ठेवण्यासाठी व त्यावर कार्यवाही न करण्यासाठी 2 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. 12 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात सायंकाळी शिरुर ताजबंद पोलीस चौकीसमोर तक्रारदारांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून धनंजय गुणाले यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले व लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक नांदेड परीक्षेत्र कल्पना बारवकर, पोलीस अधीक्षक नांदेड परिक्षेत्र अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे लातूर यांनी ही कारवाई केली.
























































