पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटांचे घर मिळवून देणार, पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ग्वाही

पोलीस कर्मचारी-अधिकारी खडतर परिस्थितीत सेवा करतात. पोलिसांच्या घरचे लोक खूप त्याग करतात. अनेक पोलीस कल्याण-डोंबिवलीसारख्या लांब भागात राहून मुंबईत डय़ुटी करतात. कित्येक पोलीस कुटुंबीयांना छोटय़ा घरात राहावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटांचे घर मिळवून देणार, कॉन्स्टेबल म्हणून रुजू होताच पोलिसांना घर मिळेल, अशी ग्वाही मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सोमवारी दिली. जन सहयोग फाऊंडेशनतर्फे पोलीस अंमलदारांच्या गुणवंत मुलांचा गौरव करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

आझाद मैदान येथील पोलीस क्लबच्या प्रेरणा हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ पार पडला. या वेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मुंबई क्राईम ब्रँचच्या विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, जन सहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार उपस्थित होते. या वेळी मुंबई पोलीस दलातील अंमलदारांच्या दहावी परीक्षेतील 50 गुणवंत मुलांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सारा सुधीर चव्हाण, तनिष पैलास दागादखैर, मयुरेश संतोष पवार, कृतिका विनोद महाडिक, सिद्धी मंगेश जाधव, सोजल दीपक बागल, नंदिनी विजय सोळसे, सानिका विनोद पाटील, समर्था तुषार जाधव, आरव गणेश अधाटे आदी मुलांचा समावेश होता. पोलिसांच्या आठ तास डय़ुटीसाठी विशेष प्रयत्न करणारे अंमलदार रवींद्र पाटील तसेच उपनिरीक्षक बाळू चव्हाण यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चोणकर यांनी केले.

नायगावमध्ये स्पोर्ट्स सेंटर उभारणार

यापुढे पोलिसांच्या मुलांना शैक्षणिकदृष्टय़ा कुठलीही उणीव भासणार नाही. त्यांचे काwशल्यगुण विकसित करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देऊ, पुढील तीन वर्षांत ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल तसेच नायगावमध्ये स्पोर्ट्स सेंटर उभारण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त भारती यांनी जाहीर केले.

यशाने हुरळून जाऊ नका .

दहावीत चांगले गुण मिळालेल्या मुलांनी यशाने हुरळून जाता कामा नये, त्यांना यापुढे आणखी परीक्षांना सामोरे जायचे आहे. स्पर्धा परीक्षांसाठी कठोर मेहनतीची तयारी आणि जिद्द कायम ठेवली पाहिजे, अशा शब्दांत अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी आणि डॉ. अभिनव देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई पोलीस दलाला 100 प्रभाकर पवारांची गरज!

पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली. समाजात पोलिसांना दोष देणारे खूप आहेत. मात्र पोलिसांच्या व्यथा जाणून, पोलीस दलाला कुटुंब मानून पोलिसांच्या गुणवंत मुलांचा गौरव करणारे फक्त प्रभाकर पवार आहेत. मुंबई पोलीस दलाला अशा 100 प्रभाकर पवारांची गरज आहे. गेल्या दहा वर्षांत आम्हाला हेच एकमेव प्रभाकर पवार मिळाले, असे काwतुकाद्गार पोलीस आयुक्तांनी काढले. तसेच जन सहयोग फाऊंडेशनच्या उपक्रमाचे काwतुक करीत संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.