पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीसह हवालदाराची बाराव्या मजल्यावरून उडी, तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या अहमदाबादमध्ये बुधवारी एका पोलीस हवालदाराने, त्याची पत्नी आणि चिमुकल्या मुलीसह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. वस्त्रापूर पोलीस ठाण्यात तैनात असणारे हवालदार कुलदीप सिंह यादव, त्यांची पत्नी रिद्धी आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी सोला अशी मृतांची नावे आहेत.

सोसायटीत राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, आधी रिद्धीने उडी मारली, त्यानंतर कुलदीपने आपल्या मुलीसह १२व्या मजल्यावरून उडी मारली. या तीनही आत्महत्यांमध्ये 10 सेकंदांचे अंतर होते. समोर आलेल्या अहवालात कोणीही कोणाला धक्का दिला नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार हे आत्महत्येचे प्रकरण असून असे पाऊल उचलण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर कुलदीप यांनी त्यांच्या मोबाईल नंबरवरून मित्रांना पाठवलेल्या एका संदेशात कुलदीपने त्याचे मित्र आणि त्याच्या पालकांसोबत घालवलेले जुने दिवस आठवले. इतर कोणतीही चिठ्ठी त्यांनी घरात ठेवली नव्हती. शवविच्छेदनानंतर तिघांचे मृतदेह भावनगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील असे पोलिसांचे म्हणणे आहे.