
पोस्को, बालविवाह प्रतिबंधक कायदा व अत्याचाराच्या घटनेतील पीडित मुलीचे जिल्हा रुग्णालयातून पोलिसांच्या ताब्यात असताना अपहरण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर मुलीला बुधवारी (दि. 6) वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून, तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांत पोस्कोसह बालविवाह प्रतिबंधक कायदा व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी यातील पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्याच्या सूचना नरसाळे यांना देण्यात आल्या होत्या. नरसाळे या पीडित मुलगी व तिच्या लहान मुलीला स्नेहालय येथील केअर टेकर सुजाता दिलीप गवळी व पीडितेच्या आईला सोबत घेऊन जिल्हा रुग्णालयात गेल्या होत्या. वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पीडित मुलीला वॉर्ड नंबर 15 मध्ये नेले. यावेळी पीडित मुलीच्या मुलीला तिच्या आजीकडे ठेवले होते.
नरसाळे या पहिल्या मजल्यावर रिपोर्ट घेण्यासाठी वॉर्ड 35 मध्ये गेल्या असताना पीडित मुलगी केअर टेकर सुजाता यांच्यासोबत बाहेर उभी होती. नरसाळे रिपोर्ट घेऊन बाहेर आल्या असता, पीडित मुलगी दिसली नाही. सुजाता व नरसाळे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात शोधले. हॉस्पिटलबाहेर बसलेल्या पीडितेच्या आईकडे विचारपूस केल्यावर ती तिच्या मुलीला दूध पाजण्याकरिता बाजूला घेऊन गेल्याचे सांगितले.
याप्रकरणी अज्ञात इसमाने पीडित मुलीसह तिच्या दीड वर्षाच्या मुलीला पोलिसांच्या रखवालीतून पळवून नेल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी पूनम नाना नरसाळे (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































