
प्रभाकर पवार
भगवान शिवशंकरांनी भस्मासुराच्या भक्तीवर खूश होऊन त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वरदान दिले होते. भस्मासुर ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल असे हे वरदान होते. त्यामुळे पुराणातील हा राक्षस सुसाट सुटला होता. जो समोर येईल त्याला भस्म करीत या राक्षसाने पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. भगवान शिवशंकर यांनाही त्याने वरदान मिळाल्यावर सळो की पळो करून सोडले होते. अखेर भगवान विष्णू पृथ्वीतलावर एका मोहिनीचे रूप घेऊन त्या दुष्ट राक्षसाचा वध करतात. ज्या विद्येचे भस्मासुराला वरदान मिळाले होते त्याच विद्येचा वापर करून मोहिनी नृत्य करताना भस्मासुराला ठार मारते. शिवशंकरांकडे मागितलेले वरदानाचे अस्त्र भस्मासुरावरच उलटते, बूमरँग होते. सध्या सीबीआयची परिस्थिती तशीच झाली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून सीबीआयने विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना अडकविण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला त्याच पद्धतीचा वापर सध्याचे सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आपल्याच सहकाऱ्यांविरुद्ध करून त्यांना जेलमध्ये टाकत आहेत. त्यामुळे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असलेल्या सीबीआयच्या तपासाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआयमधील दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील पैशांमधून झालेले भांडण पूर्णपणे चव्हाटय़ावर आले आहे. भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे दाखल होऊन त्यात देवेंद्र कुमार या सीबीआय अधिकाऱ्यास अटक करण्यात आली, तर अटक होऊ नये म्हणून सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आरोपींकडून कोटय़वधींची लाच घेऊन ‘फेवर’ करणे व आरोपींचे स्टेटमेंट बदलून त्यांना मदत करण्याच्या आरोपावरून सीबीआयचेच संचालक आलोक वर्मा यांनी कुणाचीही परवानगी न घेता राकेश अस्थाना व एका सीबीआय अधिकाऱ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘ब्लू आयड् बॉय’ असून गुजरात कॅडरच्या या ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे सीबीआयचे संचालक होण्याचे स्वप्न भंगले आहे, तर नरेंद्र मोदींना अस्थाना अडचणीत आल्याने जबरदस्त धक्का बसला आहे.
1979 च्या आयपीएस बॅचचे (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम कॅडर) आलोक वर्मा असून त्यांच्या जागेवर ओरिसा कॅडरचे 1986च्या बॅचचे आयपीएस अधिकारी नागेश्वर राव यांची सीबीआयचे प्रमुख संचालक (अंतरिम) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश अस्थाना हे 1984 च्या आयपीएस बॅचचे असून ते गुजरात कॅडरचे आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी राकेश अस्थाना यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी वर्णी लावली. त्यानंतर लालूप्रसाद यादव जेलमध्ये गेले, विजय मल्ल्या देश सोडून पळाला. नीरव मोदीचेही तेच झाले. आलोक वर्मा या सीबीआय प्रमुखाला व आपल्याला ज्येष्ठ असलेल्या अधिकाऱ्याला फाटय़ावर मारून अस्थाना तपास करू लागले. वर्मा यांना रिपोर्ट न करता अस्थाना पीएमओ कार्यालयाला रिपोर्ट करू लागले. त्यामुळे संतापलेल्या आलोक वर्मा यांनी अस्थाना यांना जाळ्यात अडकविले आणि मोईन कुरेशी या आरोपीकडून अस्थाना यांनी काही कोटी रुपये खंडणी वसूल केल्याचे रेकॉर्डवर आणले. तसे राकेश अस्थाना व डीवायएसपी देवेंद्र कुमार यांच्याविरुद्धचे जवाब आरोपीकडून नोंदवून घेतले आणि एफआयआर दाखल करून देवेंद्र कुमार यांना अटकही केली. आता अस्थाना यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यांना अटक होणार की त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर रद्द होणार हे लवकरच स्पष्ट होईल. आलोक वर्मा यांच्यावरही अस्थाना यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, परंतु ते सिद्ध होऊ शकले नसल्याने त्यांची पुन्हा सीबीआयच्या संचालकपदी नेमणूक करण्याचे आदेश कोर्टाने गेल्या आठवडय़ात दिले. त्यांची पुन्हा सीबीआयच्या प्रमुखपदी नेमणूक झालीही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समितीने वर्मांची तडकाफडकी बदली करून त्यांची अडगळीच्या ठिकाणी नेमणूक केली. त्यामुळे निवृत्तीला पंधरवडा शिल्लक असताना आलोक वर्मा यांनी आपल्या केंद्रीय सेवेला रामराम ठोकला. स्वेच्छेने राजीनामा दिला. आलोक वर्मा आपणासही राफेलसारख्या प्रकरणात लटकवून टाकतील म्हणून पंतप्रधानांनी आलोक वर्मांचा गेम केला असे बोलले जाते. म्हणजे यापूर्वी सीबीआयचे अधिकारी सुपारी घेऊन, राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावरून प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठी आजपर्यंत वापरत होती तीच पद्धत सध्याच्या सीबीआयच्या संचालकांनी आपल्याच कार्यालयात आपल्याच सहकाऱ्यांविरुद्ध वापरली व आपल्याच सहकाऱ्यांना भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये टाकले.
तोडबाजी करून खोटय़ा स्टेटमेंट घेणे किंवा राज्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे खोटे पुरावे गोळा करून प्रतिस्पर्ध्याला संपविणे ही सीबीआयची आतापर्यंतची परंपरा आहे, असे बोलले जाते. म्हणूनच त्यांना राज्यकर्त्यांचे बाहुले म्हणतात. सीबीआयच्या बऱ्याच केसेस संशयास्पदरीत्या कुणाच्या तरी सांगण्यावरून तपास केलेल्या असतात असे सीबीआय अधिकारीच सांगतात. तेलगी घोटाळय़ात सीबीआयने काय केले! महाराष्ट्र ‘एसआयटी’ने केलेल्या संशयास्पद तपासावर शिक्कामोर्तब करून महाराष्ट्रातील निरपराध पोलीस अधिकाऱ्यांना लटकविले. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना संपविण्याची ही पण सुपारीच होती. त्यामुळे सीबीआयने काँग्रेसच्या काळात जी कुकर्मे केली त्याचीच री सध्याच्या सीबीआय अधिकाऱ्यांनी ओढली. परंतु भ्रमाचा हा भोपळा फुटला आहे. ‘सीबीआय’ची स्वतःची विद्या स्वतःवरच उलटली आहे. सीबीआयची विश्वासार्हता संपली आहे. या संस्थेबद्दल जनसामान्यांना असलेला मानसन्मान धुळीला मिळाला आहे. ‘पारदर्शक’ कारभाराचे तीनतेरा वाजले आहेत. तेव्हा विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न पडतो.
































































