दूर्गा पूजेवेळी मंडापात कुराण ठेवणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांनी दिली ही माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bangladesh-riot

दूर्गा पूजेवेळी झालेल्या धर्मांधांच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतर आता बांग्लादेशच्या कोमिल्ला पोलिसांनी हिंसा भडकवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवल्याची माहिती दिली आहे. कोमिल्लाचे पोलीस अधीक्षक (एसपी) फारूक अहमद यांनी ढाका ट्रिब्यूनला सांगितले की, या प्रकरणी ज्या व्यक्तीचा शोध घेत होतो, त्याची ओळख पटवण्यात यश आले आहे.

इकबाल हुसैन असे त्या व्यक्तीचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे. आरोप आहे की कोमिल्ला जिल्ह्याच्या सुजानगरचा राहणाऱ्या हुसैनने 13 ऑक्टोबर रोजी नानुआ दिघिर पूजा मंडपात कुराण ग्रंथाची एक कॉपी ठेवली होती.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी याची माहिती दिली. बांग्लादेश पोलिसांनी मंडपात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेज तपासले. यामध्ये हुसैन मंडपात कुराण ग्रंथाची कॉपी ठेवताना दिसला आहे. त्यांनी माहिती दिली की, इकबाल हुसैनचा शोध घेतला जात आहे. मात्र तो फरार आहे. इकबालच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे की, त्याच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा कुणीतरी घेतला आहे. तो 10 वर्षांपासून मानसिक रुग्ण आहे, असे त्यांनी सांगितले.

7 ऑक्टोबर रोजी बांग्लादेशातील चांदीपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्यात दूर्गा पूजेवेळी दंगल उसळली. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तर 60 जण जखमी झाले. त्यासोबतच हिंदूंची घरेही जाळण्यात आली. तर काही भागात हिंदूंच्या घरे आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली.