
महाविद्यालयीन तरुणाच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या मागणीला नकार दिल्याच्या रागातून त्या युवकासोबत पोलिसानेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱयाला अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली.
हणमंत कृष्णा देवकर (वय 34, रा. ईश्वरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 27 ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास हणमंत देवकर आणि आणखी एक पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रणीला भेटून वसतिगृहात येत होता. तेथे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांनी त्याला अडवून ‘आता कोठून आलास? इथे काय करतोयस’ अशी चौकशी केली. त्या युवकाने मैत्रिणीला भेटून आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या युवकाकडून त्याचा फोन नंबर घेतला.
29 ऑक्टोबरला त्या युवकाच्या महाविद्यालयाच्या गेटजवळ जाऊन हणमंत देवकर याने त्याला फोन करून भेटायला येण्यास सांगितले. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्याचे प्रेमप्रकरण तुझ्या व मैत्रिणीच्या घरी सांगेन, अशी धमकी दिली. त्या युवकाने आपल्या मित्रांकडून 4000 रुपये उसने घेऊन हणमंत देवकर याला दिले.
तेवढय़ावर न थांबता देवकर याने त्या तरुणाला ‘मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांग’ असे सांगितले. संबंधित तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे, असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर देवकर याने त्या युवकाला त्याच्या वसतिगृहातील रूमवर नेले. तेथे देवकर याने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले. त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून तो तेथून निघून गेला.
21 नोव्हेंबरला देवकर याने पुन्हा त्या युवकाला फोन करून महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेत शारीरिक संबंधाची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंधित तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवालदार देवकर याच्याविरोधात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ हवालदार देवकर याला अटक केली आहे.


























































