रेकॉर्डर घेऊन पळालेला ‘तो’ पोलीस गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

50 हजार रुपयांची लाच मागणी व लाच मागणी पडताळणीदरम्यान डिजिटल व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळालेल्या पोलीस अंमलदाराला अटक करण्यात आली आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42) असे अटक केलेल्या अंमलदाराचे नाव आहे.

काळ्या बाजारातील तांदूळप्रकरणी कोतवाली पोलिसांत दाखल गुह्यात आरोपी न करण्यासाठी निपसे याने दुकानदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, पडताळणी सुरू असताना अंमलदार निपसे व्हाईस रेकॉर्डर घेऊन पसार झाला होता. दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर तो स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक शरद गोर्डे तपास करीत आहेत.