
जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर अशोक खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांला लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. तक्रारदारावर दाखल असलेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी जालन्यात करण्यात आली आहे. यामुळे जालन्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लोकसेवक जालनाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर अशोक खिरडकर, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे, पोकॉ. विठ्ठल पुंजाराम खार्डे असे या लाच स्विकारणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग पुणे यांनी लाचेची पडताळणी 18 ते 19 मे दरम्यान केली. त्यानंतर गुरुवारी तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी 5 लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 3 लाख रुपये लाच रक्कम मागणी केली. त्यातील 2 लाख लाचेची रक्कम कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे यांनी स्वीकारले असता, त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस उपअधिक्षक वर्षाराणी पाटील,पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पो.हवा. नवनाथ वाळके,पो.कॉ. किरण चिमटे, पो.कॉ. दिनेश माने यांनी केली.




























































