7076 उमेदवार झाले भावी पोलीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी पात्र असलेल्या 7076 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी कागदपत्रे, मैदानी चाचणी, आणि लेखी परीक्षेदरम्यानची सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गृह विभागाने मुंबई पोलीस दलात 7076 शिपाई पदासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पोलीस शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. महागाई, बेरोजगारी यामुळे मोठय़ा प्रमाणात राज्यभरातून उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला होता. त्यात डॉक्टर, वकील, मास्टर डिग्री असलेले अनेक उमेदवार होते. 31 जानेवारीपासून मुंबईतील विविध मैदानांत चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. पाच लाख 81 हजार उमेदवारांतून सुमारे 2 लाखांहून अधिक उमेदवार हे मैदानी चाचणीसाठी पात्र झाले होते. मैदानी चाचणीदरम्यान उमेदवार जखमी झाल्याच्या घटना मुंबईत घडल्या होत्या. तसेच काही डमी उमेदवारदेखील मैदानी परीक्षेसाठी आले होते. अशा डमी उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मैदानी परीक्षेनंतर उपलब्ध पदे आणि एकूण उमेदवार यांच्या संख्येनुसार प्रमाण ठरवण्यात आले. त्यानुसार लेखी परीक्षेसाठी 83 हजार 743 उमेदवार हे पात्र झाले. 7 मे रोजी मुंबईतील 215 सेंटरवर लेखी परीक्षा घेण्यात आली. चार ठिकाणी कॉपी, ब्लू टूथ बटणाचा वापर झाल्याने पोलिसांनी गुन्हे नोंद केले होते. लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. पात्र असलेल्या 7076 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. काही उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.

पात्र उमेदवारांना पोलीस दलात सामावून घेण्यापूर्वी त्यांची कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, मैदानी आणि लेखी परीक्षा यांच्या गुणपत्रिका आदींची खात्री केली जाणार आहे. जर पात्र उमेदवारांमध्ये काही त्रुटी आढळल्यास प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.