बीडचे पोलीस वेळेत पोहोचले, धुळ्याची पुनरावृत्ती टळली

22

उदय जोशी । बीड

मुलं पळवणारी टोळी समजून धुळ्यामध्ये एका टोळक्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर बीड जवळ दोघे जण संशयित सापडताच त्यांना सात ते आठ नागरिकांनी घेरले आणि मारहाणीला सुरुवात केली. मात्र घटनेची माहिती कळताच बीडच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस तपासमध्ये दोघांपैकी एक वेडा आहे अन दुसरा दारूच्या नशेत तर्र असल्याचे समोर आले आहे.

धुळे मारहाण प्रकरणी १२ जणांना अटक

सोमवारी रात्री अकरा वाजता धुळे – संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेडगाव येथे पोलिसांच्या तत्परतेमुळे धुळ्याची पुनरावृत्ती टळली. बीड ग्रामीणचे स.पो.नि. शीतलकुमार बल्लाळ यांना फोनवरून माहिती मिळाली की, पेंडगाव जवळ प्रवाशी गाड्या अडवून लुटणारे दोघे पकडले आहेत. ते वेड्याचे सोंग घेत आहेत, लवकर पोहोचा. यावरून नाईट राउंड करणारी पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली,

घटनास्थळी ७ ते ८ लोकांच्या जमावाच्या ताब्यात ते संशयित दोघे होते आणि त्यास मारहाण करण्यासाठी लोक सरसावले होते. सहस्यक फौजदार गायकवाड आणि नाईक पोलीस येळे यांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले दोघांची ही चौकशी केली असत यातील एक जण मुकुंद मुरलीधर दुषी (वय ४५ रा. कारीमपुरा, बीड) असा असून तो वेडसर आहे. त्याचा भाऊ मिलिंद दुषी याना बोलावून त्याची खात्री केली. तर दुसरा अशोक मोहन माथाडे (रा. पंधना रोड, ता जी खंडवा, मध्यप्रदेश) असून तो दारूच्या नशेत होता. तो ट्रकवर क्लिनर आहे. ट्रक चालकाशी वाद झाला म्हणून चालकाने त्यास पेंडगाव जवळ सोडून दिले होते. हे दोघे सोबतच आहे असा जमावाचा गैर समज झाला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

आपली प्रतिक्रिया द्या