ऐन वादळात पोलिसाने वाचवले तरुणाचे प्राण, खाकी वर्दीतील देवदूत धावला मदतीसाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साप चावल्याने रस्त्यात पडून असलेल्या तरुणाचे गोराई पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश खेडकर यांनी प्राण वाचवले आहे. ‘तौकते’ वादळामुळे बोट बंद असल्याने खेडकर यांनी सुरेंद्र प्रताप या तरुणाला स्वतŠच्या मोटारसायकलवरून गोराईहून उत्तनला नेले. खेडकर यांनी सुरेंद्रला वेळेत रुग्णालयात आणून त्याचे प्राण वाचवले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुरेंद्र हा गोराई गावातील किराणा दुकानात कामाला आहे. तीन दिवसांपूर्वी तो किराणा माल देण्यासाठी जात होता. तेव्हा ‘तौकते’ वादळामुळे वारा सुटला होता. त्याचदरम्यान सुरेंद्रला साप चावला. साप चावल्यामुळे सुरेंद्र रस्त्यात पडून होता. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्यातच वादळी वाऱयामुळे झाड अंगावर पडेल अशी भीतीदेखील सुरेंद्र वाटत होती. दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हते. तेव्हा योगेश हे पोलीस ठाण्यातून घरी जात होते. कोणी तरी रस्त्यावर पडल्याचे पाहून योगेश यांनी मोटारसायकल थांबवली. तो किराणा मालाच्या दुकानात काम करणारा सुरेंद्र होता.

 योगेशने सुरेंद्रच्या हाताला आणि पायाला रशीने बांधले, जेणेकरून विष सुरेंद्रच्या शरीरात जाणार नाही. सुरेंद्रला वेदना सहन होत नव्हत्या. त्याला उपचारासाठी बोरिवलीला न्यायचे तर वादळामुळे बोटी बंद होत्या. वेळेत उपचार न मिळाल्यास ते सुरेंद्रच्या जिवावर बेतेल अशी भीती योगेशला होती. तेव्हा योगेशने सुरेंद्रला भर वादळी पावसात मोटरसायकलवरून उत्तनला नेले. सुरुवातीला एका रुग्णालयात सुरेंद्रला घेतले नाही. त्यानंतर योगेश याने सुरेंद्रला उत्तन येथील मारिश रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. वेळेत उपचार मिळाल्याने सुरेंद्रचे प्राण बचावले.

मुंबईत आपले कोणीच नाही. साप चावल्यावर आता आपण वाचणार नाही असे वाटत होते, तेव्हा समोरून तुम्ही येत असल्याचे दिसल्याने आधार वाटला. देवदूतासारखे तुम्ही मदतीला आलात. सॅल्यूट गोराई पोलीस आणि मुंबई पोलीस!! – सुरेंद्र प्रताप, जखमी