महासभेसाठी आषाढी वारीपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पंढरपूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महासभेसाठी पोलिसांनी आषाढी वारीपेक्षाही अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. महासभेच्या पूर्वसंध्येला रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पंढरपूर शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

16 पोलीस करणार चित्रीकरण
शिवसेनेच्या महासभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री, राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे शहरातील विविध ठिकाणी 16 पोलीस कर्मचारी कॅमेऱयाद्वारे चित्रीकरण करणार आहेत.

गुप्त विभागाची 26 लोकांची टीम
सभेपूर्वी व सभेच्या दरम्यान कोणतीही घटना घडू नये व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या गुप्त विभागातील 26 कर्मचारी शहरातील विविध ठिकाणांवर नजर ठेवून राहणार आहेत.

असा असेल बंदोबस्त
पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, 7 पोलीस उपअधीक्षक, 16 पोलीस निरीक्षक, 50 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1700 पोलीस कर्मचारी, 900 वाहतूक पोलीस, आरसीपीची तीन पथके, क्यूआरटीची दोन पथके, एसआरपीएफची एक कंपनी, बीडीडीएसची दोन पथके.

पोलिसांना क्यूआर कोड कार्ड
बंदोबस्तासाठीच्या पोलिसांना क्यूआर कोडचे आयकार्ड देण्यात आले आाहे. अशा प्रकारचे कार्ड वाटप करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग पंढरपुरात राबविला जात आहे. क्यूआर कोडचे कार्ड स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले आहे. क्यूआर कार्डाच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱयाची त्याच ठिकाणावरून हजरी घेण्यात येईल तसेच त्याच ठिकाणी त्यांना ऑनलाईन पद्धतीने सूचना मिळतील व सध्या तो पोलीस कोणत्या ठिकाणी आहे याची माहितीदेखील अधिकाऱयांना कळणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.