दहीकाला उत्सवासाठी पोलीस पथक सज्ज; शहरात चोख बंदोबस्त

249

गोकुळाष्टमीचा सण शहरात मोठय़ा उत्साहात, आनंदात आणि सुरक्षित साजरा व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. सण साजरा होत असताना शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जवळपास 40 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी शनिवारी ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत.

दहीहंडी उत्सव शहरात मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. नागरिकदेखील मोठय़ा संख्येने दहिकाला पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली आहे. जुहू येथील हरे राम हरे कृष्ण मंदिर तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणच्या दहीहंडय़ा व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच साध्या वेषातील पथकांची सतर्प गस्त ठेवण्यात येणार असून महिलांचे छेडछाडीचे प्रकार घडू नयेत याकरिता विशेष पथक नेमण्यात आले आहे.

असा असेल बंदोबस्त
पोलीस ठाण्याचा बंदोबस्त, सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

लगेच संपर्क साधा
नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांनी 100/ ट्विटर किंवा 7738133133/7738144144 या क्रमांकांवर मेसेज करून पोलिसांशी संपर्क साधता येईल.

आयोजक व गोविंदा पथकांना आवाहन
– दहीहंडी उत्सवासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे.
– गोविंदा पथकास चेस्ट गार्ड, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट व कार्यक्रमाच्या ठिकाणी कुशन लेयर पुरवावेत.
– गोविंदा पथकांमध्ये दारू प्यायलेल्या व्यक्तीने सहभाग होऊ नये. अशांना सहभागी करून घेऊ नये.
– या सणाचे पावित्र्य मलिन होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या