
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला ठिकठिकाणी मिळणारा तुफान प्रतिसाद, उत्स्फुर्तपण जमणारी गर्दी, लोकांचं मिळणारं प्रेम आणि आशीर्वाद यामुळे मिंधे-फडणवीस सरकारचं धाबं दणाणलं आहे. विशेष म्हणजे गद्दार आमदार-खासदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गद्दारांना घाम फुटला आहे.
मराठवाड्यात आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी त्यांच्या मार्गावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यानेही आदित्य ठाकरे थांबले नाहीत. त्यांची शिवसंवाद यात्रा सुरूच ठेवली. सुरक्षेचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्य सरकाने सुरक्षा वाढवली. मात्र पोलिसांच्या सुरक्षेच्या आडून दहशत निर्माण करण्याचा गद्दार आमदारांचा उद्देश असल्याचं बिडकीन येथील सभेवेळी पाहायला मिळालं. सुरक्षेच्या नावाखाली प्रचंड पोलीस बळ सभास्थळी आणलं गेलं. सभाठिकाणच्या आसपासची दुकानं बंद करण्यात आली. जागोजागी पोलीस उभे करण्यात आल्यानं सभापरिसरात दहशतीचं वातावरण झालं. दहशत इकती की काही लोकांनी लांबूनच सभा पाहायचा निर्णय घेतला.
गद्दारांच्या सभांना गर्दी होत नसल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. खुद्द मुख्यमंत्री असले तरी खुर्च्या रिकाम्या दिसतात. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या सभांना मात्र भरगच्च गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे सुरक्षेच्या आडून सभेची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती.
अगदी पत्रकारांना देखील सभास्थळी जाण्यापासून रोखण्यात येत होतं. केवळ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना सोडण्यात येत होतं. तर पोलीसही त्यांच्याशी बोलताना दिसत होते.
दरम्यान, सरकारी यंत्रणांच्या आडून करण्यात येणाऱ्या दहशतीला न जुमानता शिवसैनिक मोठ्याप्रमाणात सभास्थळी पोहोचले. अनंत अडचणींवर मात करत त्यांनी आदित्य ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी सभास्थळी हजेरी लावली. त्यामुळे शिवसैनिकांनी गद्दार आमदार संदीपान भूमरे यांचे सर्व मनसूबे उधळल्याची चर्चा या सभास्थळावर सुरू होती.