
आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा रविवारी (दि. 6) होत असून, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.
आषाढी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियंत्रणासाठी 8 हजार 117 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधीक्षक, चार अपर पोलीस अधीक्षक, 24 पोलीस उपअधीक्षक, 76 पोलीस निरीक्षक, 312 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 4 हजार 850 पोलीस अंमलदार व 2 हजार 850 होमगार्ड तसेच 5 एसआरपीएफ कंपनी, 7 बीडीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी चार पथके, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित 14 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने 10 ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
जड वाहतूक शहराबाहेरून
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी 14 ठिकाणी डायव्हर्शन पॉइंट सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर खासगी वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 17 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहाकार्य करावे, असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी केले आहे.
12 ठिकाणी वॉच टॉवर; 300 सीसीटीव्ही
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नदीपात्र 65 एकर, महाद्वार, महाद्वार घाट, पत्राशेड यांसह आदी ठिकाणी 12 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी ‘माउली स्कॉड’ची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 300 सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. वारकऱयांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.