पोलिसाने फिल्मी स्टाइलने केला चोरट्याचा पाठलाग, आवळल्या मुसक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गस्तीवर असलेल्या बीट मार्शलने दीड किलोमीटरपर्यंत फिल्मी स्टाइलने पाठलाग करून वाहनचोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या. पोलीस शिपाई राजकरण बिळस्कर यांच्या कामगिरीची माहिती कळताच मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल आणि सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी पोलीस ठाणे गाठून बिळस्कर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

शुक्रवारी रात्री बिळस्कर बीट मार्शल म्हणून ड्युटीवर होते. रात्री दीड वाजताच्या सुमारास वडाळा टीटी परिसरातून एक संशयास्पद गाडी गेल्याचे बिळस्कर यांच्या निदर्शनास आले तेव्हा बिळस्कर यांनी त्या गाडीचा वडाळा आयमॅक्सपर्यंत फिल्मी स्टाइल पाठलाग केला. पाठलाग केल्यावर ती गाडी आयमॅक्स सिनेमागृहाजवळ थांबली. बिळस्कर यांनी त्या गाडीत बसलेल्या शेखकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रांची मागणी करताच शेखने गाडी सुसाट वेगात पळवली तेव्हा बिळस्कर यांनी पुन्हा पाठलाग सुरू केला. पाठलाग केल्यावर प्रतीक्षानगर येथील परिसरात शेखने गाडी थांबवली.

गाडी थांबवल्यावर पोलिसाला घाबरवण्याकरिता शेखने गाडीतून कोयता काढला. पण बिळस्कर हे घाबरले नाहीत. त्याच दरम्यान शेख आणि त्याच्या साथीदाराने तेथून पळ काढला. पळ काढल्यावर शेख हा प्रतीक्षानगर येथील एका भिंतीवर उडी मारून पळून जात होता तेव्हा बिळस्कर यांनी पाठलाग करून शेखला ताब्यात घेतले. त्याला पुढील चौकशीकरिता पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान शेखने ती गाडी परळच्या भोईवाडा येथून चोरल्याची कबुली दिली.

वरिष्ठ निरीक्षक अंकुश काटकर यांनी बिळस्कर यांच्या कामगिरीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. बिळस्कर यांच्या कामगिरीची माहिती कळताच सुखद धक्का देण्याकरिता मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल आणि सहआयुक्त देवेन भारती हे वडाळा टीटी पोलीस ठाण्यात पोहोचले. जयस्वाल यांनी बिळस्कर यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. तसेच सर्व पोलीस अधिकाऱयांशी संवाद साधला. पोलीस आयुक्तांच्या या कौतुकामुळे पोलिसांचे निश्चितच मनोधैर्य वाढले आहे.