पोलीस बनले कुरिअर बॉय ; 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धूम स्टाईलने मोटरसायकल चालवून महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र चोरणाऱया सराईत चोरटय़ाला अखेर जुहू पोलिसांनी अटक केली. विशाल गौतम कौर ऊर्फ सत्यजीत असे त्याचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस कुरिअर बॉय बनले. सत्यजितच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार गृहिणी या गेल्या आठवडय़ात त्या पती आणि मुलासोबत जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्या रात्री रिक्षाने घरी आल्या. रिक्षातून उतरत असताना विशालने धूम स्टाईलने मोटरसायकल चालवून महिलेचे मंगळसूत्र चोरून पळ काढला. मंगळसूत्र चोरीप्रकरणी महिलेने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक आयुक्त महेश मुगुटराव यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक निरीक्षक विजय धोत्रे, उपनिरीक्षक अभिषेक पाटील, मेघा नरवडे, तोडणकर, पाटील, महागडे, मांडेकर, भोसले, तडवी, तायडे, टोकरे, तासगावकर आदीच्या पथकाने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत सत्यजित हा लोकलने मालाड येथून मालवणी येथे जात असल्याचे दिसले. पोलिसांनी एकूण 250 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी मालवणी येथे तीन दिवस फिल्डिंग लावली. सत्यजितला पकडण्यासाठी पोलीस कुरिअर बॉय बनले. कुरिअर बॉयच्या माध्यमातून पोलिसांनी सत्यजितची माहिती काढली. सत्यजित नशा करण्यासाठी घराबाहेर आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

चोरीच्या मोटरसायकलचा वापर
सत्यजित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. तो चोऱया करण्यासाठी रात्री घराबाहेर पडतो. रस्त्याला पार्क केलेल्या मोटरसायकल चोरतो. त्या चोरीच्या मोटरसायकलीचा वापर मंगळसूत्र चोरीसाठी करतो. त्यानंतर त्या मोटरसायकली रेल्वे स्थानक परिसरात टाकून पळ काढतो.