
कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षांनी नेतृत्वबदलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा करार झाला होता, असा दावा करून शिवकुमार समर्थकांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्यातच शिवकुमार यांनी सोशल मीडियावर ‘दिलेला शब्द पाळा’, अशी पोस्ट केल्यानंतर कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापले आहे.
शिवकुमार यांची सोशल मीडियावरील पोस्टवरून पुन्हा नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. ‘वर्ड पॉवर इज वर्ल्ड पॉवर’, अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर टाकली. दिलेला शब्द पाळा, याचे स्मरण करून देण्यासाठी त्यांनी ही पोस्ट टाकल्याची चर्चा रंगली आहे. कर्नाटकमध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यावेळी शिवकुमार हेदेखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत़े.
मंत्री म्हणतात, हायकमांडचा निर्णयच अंतिम
शिवकुमार आणि कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांच्यात बुधवारी रात्री उशिरा भेट झाली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीबदलाची शक्यता फेटाळली. जो काही संभ्रम आहे तो लवकरच दूर होईल, मात्र हे आमच्या हातात नाही. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी हायकमांडला निर्णय घ्यावा लागेल, असे जारकीहोळी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
पॉवर शेअरिंगचे मला माहिती नाही – यतींद्र सिद्धरामय्या
सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही. याआधी पॉवर शेअरिंगबाबत काही चर्चा झाली होती की नाही, याबाबत मला माहिती नाही. मात्र हायकमांडचा निर्णयच अंतिम असतो, असे यतींद्र म्हणाले.




























































