
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटनी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ते कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. यासंदर्भात त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेत आहे, असे या पत्रात कळवले आहे. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. 81 वर्षांचे अँटनी हे सध्या केरळचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा राज्यसभेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 1970 मध्ये पहिल्यांदा आमदार बनलेले अँटनी हे 52 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राजकीय संन्यासाची घोषणा करतानाच त्यांनी यापुढे दिल्लीला न राहता तिरुवनंतपुरमला शिफ्ट होणार असल्याचेही म्हटले आहे. पक्षाने अनेक संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.



























































