प्रदूषणाच्या असह्य वेदना

302

>> अभय यावलकर 

कोणत्याही शहरातील नागरिकांच्या जीवनमानावर तेथील हवामानाचा परिणाम होत असतो. हवेच्या दर्जावरून तेथील लोक किती वर्षं निरोगी आयुष्य जगतील हे ठरतं. दिल्लीत गेल्या २० वर्षांत हवेचा दर्जा घसरत चालला आहे तर दुसरीकडे दूषित वायूचे आणि विषारी कणांचे प्रमाण वाढत चालले आहे. दिल्लीचा एक्यूएलआय (एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स) गेल्या काही वर्षांत प्रचंड घसरला आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तर तो धोकादायक पातळीसुद्धा ओलांडतो. हे वाढणारे प्रदूषण केवळ दिल्लीकरांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे.

हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत असल्याने दिल्लीतील जनता प्रचंड त्रस्त आहे. काल परवा झालेल्या दिवाळीत ही गुणवत्ता आणखीनच घसरलेली आहे. दरवर्षीपेक्षा कमी फटाके फोडूनही वायुप्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर झालेली आहे. काही ठिकाणी नाकातोंडाला लावण्यासाठी मास्क वाटप करण्यात आले, परंतु ही तात्पुरती योजना काय कामाची असा प्रश्न समोर उभा आहे. धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे श्वसनाचे आजार, इन्फेक्शन्स, हदयविकार, फुप्फुसांचे आजार वाढलेले आहेत. 14 कोटी जनतेला श्वसन विकारामुळे दहापटीने श्वास जास्त घ्यावा लागत आहे तर दरवर्षी 20 लाख मुलं जन्म होण्याच्या आतच मृत्युमुखी पडत आहे. ही परिस्थिती आहे आपल्या देशातील आपल्या कुटुंबांतील जनतेची. हे चित्र बदलण्यासाठी दिवाळी फटाक्याविना साजरी करता येईल काय?

नेमीची येतो पावसाळा या म्हणीच्या उक्तीप्रमाणे प्रदूषणाकडे पहाण्याचा दृष्टिकोनही पावसाप्रमाणेच झालेला आहे. दरवर्षी फटाक्यांवर येणारी बंदी कधीच बंदी वाटत नाही, कारण दोन ते तीन दिवस फटाक्यांची आतषबाजी होत राहते आणि आम्ही सर्वजण डोळे बंद करून ते अनुभवत राहतो. ज्या पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल जाणीवच नाही असे पालक हजारो रुपयांचे फटाके आपल्या मुलांना घेऊन देतात. सोबतच स्वतःही फटाके फोडण्यात सामील होऊन जातात. आपण काय करतो आहोत याचे भान हरपून बसलेली जनता आपल्यासाठीच पर्यावरणात विष ढवळते आहे. दिल्लीतील प्रदूषणाने तीव्रतेची पातळी ओलांडली आहे. प्रदूषण करण्यात वाहनांचा मोठा वाटा असला तरी या दिवाळीत ही पातळी धोक्याच्या पलीकडे गेली आणि पुन्हा वायुप्रदूषणाकडे जनतेचे लक्ष वेधले गेले. ज्या वायुप्रदूषणामुळे फुप्फुसाचे, दम्याचे, श्वसनाचे आजार मोठय़ा प्रमाणात होतात हे माहीत असूनही सर्वसामान्य जनता याकडे का दर्लक्ष करते, असा प्रश्न समोर उभा राहतो.

ज्या फटाक्यांमुळे सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि धुळीचे कण हवेत मिसळले जातात आणि आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करतात ते फटाके फोडून आम्ही दिवाळी का साजरी करतो? वास्तवात दीपावलीचा शुद्ध अर्थ आहे अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी दीप प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा करणे. हा अर्थ न समजून घेताच आम्ही वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणाची निर्मिती करत आहोत. हवेतील प्रत्येक प्रदूषीत घटकाचा विचार करता सल्फर डायऑक्साईड वायू आपल्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण करून दम्यासारखे, हदयविकारासारखे गंभीर आजार निर्माण करतो परिणामी हार्ट ऍटॅकसारख्या जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागते, कार्बन डायऑक्साईड वायू हवेत कार्बनचे बारीक कण निर्माण करतो परिणामी चिडचिड आणि डोकेदुखी सुरू होते तर कार्बन मोनॉक्साईड एक प्रकारे हवेत विषारी द्रव्य मिसळतो आणि म्हणूनच वायुप्रदूषण निसर्ग प्रक्रियेतील एक घातक चक्र समजले जाते. हे घातक चक्र फटाक्यांच्या माध्यमातून घराघरात विकत आणले जाते ही मोठी शोकांतिका आहे.

एकीकडे वाढत्या जीवनशैलीच्या नावाखाली अनेक गोष्टींची निर्मिती केली जाते आणि त्यातून न कळत प्रदूषण होत असल्याचे दिसून येते. रासायनिक कारखाने, वीज निर्मिती केंद्र, घर बांधणी, दळणवळण यंत्रणा, रस्ते उभारणी, फर्निचर निर्मिती, वाहन निर्मिती अशा अनेक उद्योगांमधून वायुप्रदूषण होत असताना आम्हाला वैयक्तिक पातळीवर या सर्वांना कसा आळा घालता येईल ते पहाणे आवश्यक आहे. मी फक्त चारच फटाके फोडले असे म्हणताना या चार फटाक्यांनी कोणते वायू बाहेर सोडले, ते कोणत्या रंगाचे होते, धूर किती बाहेर निघाला, त्याने किती जणांवर परिणाम केला असेल असा विचार जरूर करून पहा. म्हणजे गावातील माझ्यासारख्या 1000 कुटुंबांमध्ये असे चार चार फटाके फोडले गेले तर काय होईल? आणि त्याचा परिणाम दुसऱयांनाच नव्हे तर माझ्या घरातील प्रत्येकावर होणार आहे हे विसरून चालणार नाही. कोणताही परिणाम हा तात्पुरता न होता तो दुरगामी असू शकतो आणि म्हणूनच हीच वेळ आहे आपल्यासोबत मुलांना आणि कुटुंबाला सावरण्याची. आज जीवनशैलीच्या नावाखाली आम्ही आमचे संस्कार हरवून बसलो आहोत. त्याचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयावर होत असल्याची जाणीवही आम्हाला होत नाही ही दुर्दैवी अवस्था या जीवनशैलीच्या नावाखाली आमची झालेली आहे. आपण या निसर्गाचे एक घटक आहोत आणि आपल्याला उत्तम आरोग्यासाठी चांगले वातावरण हवे आहे. कितीही पैसे खर्च केले तरी उत्कृष्ट हवा मिळवता येणार नाही आणि म्हणूनच हवेची गुणवत्ता उत्तम असेल तर आनंददायी जीवन जगता येईल. यासाठीच आपण सर्वांनी वायुप्रदूषण कमी करण्यावर भर दिला पाहिजे.

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी थर्मामीटरसारखे हवेची गुणवत्ता दर्शक यंत्र वापरण्यात येते. या दर्शकानुसार 0-50 चांगली हवा, 51-100 समाधानकारक, 101-200 ठीक, 201-300 खराब, 301- 400 अतिखराब आणि 401- 500 धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त अशी क्रमवारी लावली जाते. 1मीटर X 1मीटर X 1 मीटर आकारमानाच्या घनाकृती ठोकळय़ात असणारे धुळीचे कण म्हणजेच Micrograms / M3. किंवा Parts per Million cube (PPM). आज दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त असून वातावरणातील प्रदूषीत कणांचा आकार 2.5 मायक्रोमीटर एवढा मोठा झालेला आहे. तुलनाच करायची झाल्यास माणसाच्या केसाच्या जाडीहून लहान असा कण. पण हा हवेतील कण माणसांच्याच नव्हे तर एकूणच संपूर्ण सजीव सृष्टीला घातक ठरणारा आहे. म्हणूनच फक्त दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचा ध्यास घेऊया आणि आपल्या कुटुंबाला जगण्यासाठी पैसे ठेवण्यापेक्षा हरितश्वास घेण्यासाठी प्रदूषणमुक्त पर्यावरण ठेवण्याचा निर्धार करूया.

(लेखक सौरऊर्जा अभ्यासक आहेत)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या