
पवईमध्ये शौचालयाच्या टाकीची स्वच्छता करताना दोन कामगार टाकीत पडून गुदमरल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये एका 25 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती अत्यवस्थ असून त्याच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शौचालयांच्या टाकीची अंतर्गत स्वच्छता मशीनच्या सहाय्याने करणे आवश्यक असताना हे कामगार टाकीत गेलेच कसे असा सवाल उपस्थित होत असून संबंधित पंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हिरानंदानी रुग्णालयासमोरील राज ग्रँड दोई बिल्डिंग येथे अल्ट्रा टेक प्रा. लि. कंपनीतील हे दोन कामगार सकाळी 12 वाजताच्या सुमारास शौचालयाच्या टाकीचे काम करीत होते. यावेळी अचानक ते टाकीत कोसळले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शौचालयातील काम करताना आतील गॅसमुळे हे दोन्ही कर्मचारी बेशुद्ध पडून टाकीत अडकले होते. या अपघातात मृताची ओळख पटलेली नसून गंभीर जखमीचे नाव फुलचंद कुमार (28) असून याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.




























































