मृत्यूनंतरही मदतीचा हात थांबला नाही, ‘सुपरस्टार’ पुनीत राजकुमारच्या नेत्रदानाने चौघांना दृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार (46) यांचे हृदयविकाराने निधन झाले. गेल्या शुक्रवारी सकाळी जीममध्ये कसरत करताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्याला बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पुनीत राजकुमार जाता जाताही सत्कार्य करुन गेला असून त्याच्या नेत्रदानामुळे चार लोकांना दृष्टी मिळाली आहे.

पुनीत राजकुमार हा केवळ अभिनय नव्हे तर सामाजिक कार्यातही सक्रिय होता. मृत्यूनंतरही त्याच्या मदतीचा हात थांबला नाही. पुनीतच्या कुटुंबियांनी त्याचे डोळे दान केले. निधनानंतर सहा तासात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. आता एक चांगली बातमी येत असून पुनीतच्या नेत्रदानामुळे चौघांना दृष्टी मिळाल्याचे समजते आहे. पुनीतच्या नेत्रदानामुळे तीन पुरुष आणि एका महिलेला दृष्टी मिळाली आहे. या चारही रुग्णांचे वय 20 ते 30 या दरम्यानचे आहेत. हे सर्व गेल्या सहा महिन्यांपासून ऑर्गन डोनेटच्या वेटिंग लिस्टमध्ये होते.

दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनामुळे कन्नड फिल्ड इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. पुनीत राजकुमारच्या निधनाचे वृत्त समजतात त्याचे चाहतेही शॉकमध्ये आहेत. आपला लाडका अभिनेता सोडून गेल्याची भावना सहन न झाल्यामुळे काही चाहत्यांनी आत्महत्या केली तर काहींचा हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला.

अफाट समाजकार्य

पुनीत राजकुमार 26 अनाथाश्रम, 46 मोफत शाळा, 16 वृद्धाश्रम, 19 गोशाळांना ते नियमितपणे आर्थिक मदत करत होते. म्हैसूरमध्ये शक्तीधाम नावाची संस्था स्थापन केली असून तेथे मुलींना शिक्षणाची व्यवस्था केली होती. जनतेत जागृती करणार्‍या व काही सरकारी जाहिरातींमध्ये त्यांनी विना मोबदला अभिनय केला होता. त्यांनी वडिलांप्रमाणेच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता.