सूर-ताल – दोस्ती वाद्यांशी

>>गणेश आचवल

कॅसेटच्या जमान्यापासून आजच्या डिजिटल युगापर्यंत गेली 30 वर्षे संगीत क्षेत्रात वादक म्हणून प्रभाकर मोसमकर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 आपल्या सांस्कृतिक उत्सवातून अनेकांच्या जीवनाला दिशा मिळत असते. ढोलकी, ढोलक, तबला, पखवाज अशा अनेक वाद्यांचे वादन करणारे एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोसमकर. मुंबई सेन्ट्रल येथील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव तेथे मोठय़ा जल्लोषात साजरे होत होते. त्या उत्सवात लेझीम खेळणे, टाळ किंवा झांजा वाजवणे याची आवड त्यांना निर्माण झाली. शाहीर निवृत्ती पवार, शाहीर पुंडलिक वाडेकर यांची वाद्य वादनाची कला प्रभाकर मोसमकर यांनी पाहिली होती. त्यांचे मामा जगन्नाथ मंचेकर हे वेसावकर आणि पार्टी यामध्ये प्रमुख वादक होते. असे विविध कार्यक्रम पाहिल्यावर आपणही वाद्य शिकावे असे प्रभाकर मोसमकर यांना वाटू लागले. खेतवाडीतील पतंगे मास्तरांकडून ते तबला शिकले. त्या वेळी अनेक ठिकाणी मराठी गाण्यांचे कार्यक्रम होत होते. अशा कार्यक्रमांतून प्रभाकर मोसमकर तबला आणि ढोलकी वाजवायचे.

ते म्हणतात, ‘‘त्याकाळी कॅसेटचा जमाना होता. विविध गाण्यांच्या ध्वनिमुद्रणासाठी वादकांना बोलावले जात होते. ‘नक्षत्रांचे देणे’ या कॅसेटमधील राजाराम जामसंडेकर यांनी वाजवलेले वाद्य ऐकून मी प्रभावित झालो होतो आणि मग माझ्या मामांच्या ओळखीने मी त्यांना भेटलो. सुरुवातीच्या काळात त्यांचे बंधू सहदेव जामसंडेकर आणि मग काही काळ राजाराम जामसंडेकर यांच्याकडूनही मी ढोलकी शिकलो. पंडित अरविंद मुळगावकर यांच्याकडे मी काही काळ तबला शिकलो.’’

साधारणपणे 1993 सालापासून प्रभाकर मोसमकर हे व्यावसायिक स्तरावरती काम करू लागले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी छाया यांच्या वाद्यवृंदामध्ये ढोलकी वाजवत होते. पदन्यास बॅले ग्रुपसाठीसुद्धा ते वादन करत होते. ‘मराठी सा रे ग म’, ‘सूर नवा ध्यास नवा’, ‘एम टू जी टू’ अशा विविध चॅनलवरील टीव्ही कार्यक्रमांतून ढोलकी वादनाकरिता ते आपणासमोर आले. पखवाज, हलगी, डफ, ढोलकी, तबला ही सर्व वाद्ये त्यांना येतात. अल्ताफ राजा यांच्यासोबत त्यांनी वादनासाठी रशिया दौरा केला होता. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या वाद्यवृंदात आपली कला सादर करण्यासाठी अनेक वेळा ते अमेरिकेत जाऊन आले आहेत. संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलेल्या अनेक मराठी चित्रपटांत अनेक गाण्यांसाठी प्रभाकर मोसमकर यांनी अनेक वाद्ये वाजवली आहेत.

रवींद्र साठे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, उत्तरा केळकर, आनंद शिंदे, पद्मश्री सुरेश वाडकर, पद्मश्री शंकर महादेवन, संगीतकार अशोक पत्की यांच्या अनेक मैफलींमध्ये प्रभाकर मोसमकर यांचा प्रमुख वादक म्हणून सहभाग होता. ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘माऊली 2’, ‘अजिंठा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘पांडू’ अशा अनेक मराठी चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांनी वाद्ये वाजवली आहेत. सुप्रसिद्ध कलावंत माया जाधव आणि सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी ढोलकीवादन केले आहे. लावणी कलावंत महासंघाचा सर्वोत्कृष्ट वादकाचा पुरस्कार, एकता ग्रुपचा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. ते म्हणतात, ‘‘माझ्याकडे स्वतःची अशी अनेक वाद्ये आहेत. संगीतकलेत रियाज महत्त्वाचा आहे. वाद्य वादनातून मिळणारा आनंद आणि प्रेक्षकांनी प्रत्यक्ष दिलेला प्रतिसाद हा आत्मविश्वास वाढवणारा ठरतो.’’