
संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ मासिकाचे शताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे विशेष ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिली.
आपल्या तळपत्या लेखणीने संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारे प्रबोधनकार ठाकरे यांनी 16 ऑक्टोबर 1921 रोजी ‘प्रबोधन’चा पहिला अंक प्रसिद्ध केला होता. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱया ‘प्रबोधन’ या मासिकाची शताब्दी सुरू आहे. म्हणून राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ग्रंथ प्रकल्प हाती घेतला आहे. ‘प्रबोधन’च्या अंकांचे योगदान समजावे आणि प्रबोधनकारांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी ग्रंथ प्रकाशित करत आहोत. यामध्ये ‘प्रबोधन’ मासिकाच्या दुर्मिळ अंकांचा समावेश आहे, असे सदानंद मोरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुस्तक प्रकाशन हे मुख्य उद्दिष्ट असून मंडळाने आतापर्यंत वैविध्यपूर्ण विषयांवरील 584 मौलिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ‘महाराष्ट्राची वास्तूसंस्कृती’ यावरचा नरेंद्र डेंगळे यांचा ग्रंथ लवकरच वाचकांसमोर येईल, असेही डॉ. मोरे म्हणाले.
प्रत्येक जिह्यांमध्ये मिळणार ग्रंथसंपदा
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके राज्यभरात उपलब्ध व्हावीत यासाठी प्रत्येक जिह्यात एक खासगी वितरक असेल. असे 36 वितरक निश्चित केले आहेत, असे सदानंद मोरे यांनी सांगितले. प्रत्येक खासगी वितरकाचा पत्ता, फोन नंबर मंडळाच्या वेबसाईटवर आणि फेसबुक पेजवर दिला जाणार आहे. मुंबईत गिरगाव येथील वितरक अशोक कोठावळे, मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे पुस्तके मिळतील. शासकीय मुद्रणालयाच्या मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर येथील शासकीय ग्रंथागारात पुस्तके उपलब्ध आहेत.





























































