आलिशान गाडी घेणाऱया कुलगुरूंना खेळण्यातील गाडी भेट, प्रहार विद्यार्थी संघटनेचे विद्यापीठासमोर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाने घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांच्या पैशांवर 60 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीची खरेदी करणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा आज प्रहार विद्यार्थी संघटनेकडून खेळण्यातली गाडी देऊन निषेध करण्यात आला. फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

कुलगुरू डॉ. पेडणेकर आणि प्र-कुलगुरू यांच्यासाठी आलिशान गाडय़ांची खरेदी नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या फीमधून जमा झालेला पैसा त्यासाठी वापरला गेला आहे. त्याचा निषेध नोंदवतानाच गाडीवर मर्यादेपेक्षा झालेला जास्त खर्च कुलगुरूंच्या खिशातून वसूल केला जावा त्याचप्रमाणे जुन्या गाडीचे कुलगुरूंनी काय केले याची माहिती जाहीर करावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे, मुंबई संपर्क प्रमुख अॅड. अजय तापकीर यांनी केली. पोलिसांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडून दिले.