मोदी मेलोड्रामा करतात, प्रकाश राज यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. प्रकाश राज यांनी मोदींचे दोन व्हिडीओ शेअर करून त्यांच्या बोलण्यातला विरोधाभास समोर आणला आहे. त्यावेळी त्यांनी मोदी मेलोड्रामा करतात, अशी टीका देखील केली आहे.

2016 साली पश्चिम बंगालमध्ये पूल कोसळला होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. ‘देवाने या पूल दुर्घटनेतून एक संदेश पाठवला आहे. जसा हा पूल कोसळला तसंच या राज्य सरकारमुळे बंगाल देखील संपून जाईल’ अशी टीका त्यांनी त्यावेळी केली होती. त्यानंतर 15 मे 2018 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत एक निर्माणाधीन पूल कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मोदींनी फक्त शोक व्यक्त केला होता. दोन समान दुर्घटनांवर मोदींच्या या विरोधी प्रतिक्रियांचे व्हिडीओ प्रकाश राज यांनी ट्विटर वरून शेअर केले आहेत.

‘प्रिय सुप्रीम लीडर, तुमच्या पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यात एखादी दुर्घटना घडते तेव्हा तुम्ही द्वेष पसरवता, आणि तशीच दुर्घटना तुमच्या मतदारसंघात घडते तेव्हा तुम्ही मेलोड्रामा करता. या दोन्ही पैकी तुमचा खरा चेहरा कुठला आहे ते आम्हा सर्व नागरिकांना जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला तिसरा चेहरा देखील आहे.’ अशा शब्दात प्रकाश राज यांनी मोदींवर टीका केली आहे.