
महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱयाचा खून झाल्यामुळे निवडणुकीला गालबोट लागले आहे. भाजपने प्रत्येक प्रभागात दमदाटी केली. उमेदवारावर प्रचंड दबाव आणला. हा खून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी करण्यात आला, असा गंभीर आरोप सोलापुरातील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
मनसेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा शुक्रवारी खून झाला. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी प्रणिती शिंदे यांनी शनिवारी सकाळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन केली आहे. भाजपने आधी बाळासाहेब सरवदे यांच्या चुलत भावाच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर उद्भवलेल्या वादातून हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपला बिनविरोध निवडणुका हवा होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने उमेदवारांना फरफटत नेले. बिनविरोधच्या हव्यासापोटीच बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली. मात्र ही हत्या काwटुंबिक वादातून झाल्याचे दाखवण्यात येईल, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
भाजपने परंपरेला काळिमा फासला
सोलापुरात नेहमी कोणतीही कटुता न आणता निवडणुका लढविण्याची परंपरा राहिली आहे. मात्र भाजपने या परंपरेला काळिमा फासला. भाजपकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या देतात. बंडखोर उमेदवारांवरही दबाव टाकतात. या प्रकरणातून भाजपचा चेहरा पूर्णपणे उघड झालेला आहे, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.






















































