
>> प्रसाद ताम्हणकर
काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या संसदेत दोन ममी सादर करण्यात आल्या. हे मृतदेह एलियन्सचे असल्याचा दावादेखील त्यात करण्यात आला. पृथ्वी सोडून इतर ग्रहावर जिवांची वस्ती आहे आणि ते आपल्यापेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. मात्र भविष्यात अशा सजीवांशी प्रत्यक्ष सामना झाल्यास तो मानवासाठी फायद्याचा असेल की संपूर्ण पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी धोक्याचा असेल याविषयी मतमतांतरेदेखील सुरू झाली आहेत. मात्र अशा वेळी सोशल जगतात दोन व्हिडीओ प्रचंड वेगाने प्रसिद्ध होत आहेत आणि त्यावर प्रचंड चर्चा झडत आहेत.
एका व्हिडीओमध्ये एक कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनवलेला रोबोट कुत्रा एका दिव्यांगाला सुरक्षितपणे रस्ता क्रॉस करण्यास कशी मदत करतो हे दर्शविले आहे, तर दुसऱया व्हिडीओत एक चेहरा झाकलेली व्यक्ती अत्यंत त्वेषाने एका रोबो टॅक्सीवर हातोडय़ाच्या मदतीने हल्ला करताना दिसत आहे. या दोन्ही व्हिडीओवर झडत असलेल्या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे की, आपण सध्याचे प्रगत तंत्रज्ञान, जे पुढे अधिक विकसित होत जाणार आहे, ते स्वीकारायला खरंच तयार आहोत का? एका बाजूला ‘एआय’चा वापर करून बनवलेला हा कुत्रा आहे, जो दिव्यांग, अंध व्यक्ती तसेच स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी एक वरदान ठरू शकतो. या कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये मशीन लर्निंगवर आधारलेला कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. हा कुत्रा आपल्या चारी दिशा ओळखण्यासाठी, योग्य मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर करतो. मुख्य म्हणजे हा कुत्रा सर्व प्रकारचे ट्रफिक सिग्नल्स ओळखतो आणि वाहतूक नियमांची चिन्हेदेखील त्याला समजतात.
दुसरीकडे रोबो टॅक्सी आहेत, ज्यांना अमेरिकेसारख्या प्रगत देशात प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. रोबो टॅक्सी या चालकविरहित आणि स्वयंचलित सेवा देणाऱया टॅक्सी आहेत. मात्र अनेक लोकांचा विरोध असूनही कॅलिफोर्नियामध्ये रोबो टॅक्सी सेवा देणाऱया कंपन्यांना व्यवसायाचा विस्तार करण्याची परवानगी मिळाली आहे. कॅलिफोर्नियाच्या पब्लिक युटिलिटीज कमिशनसमोर तब्बल साडेसहा तास यासंदर्भात सुनावणी झाली. यावेळी रोबो टॅक्सीच्या विरोधात आणि बाजूने शेकडो लोकांनी आपल्या साक्षी नोंदवल्या. विशेष म्हणजे या टॅक्सीला विरोध करणाऱयांमध्ये अग्निशमन दलदेखील सामील होते.
अनेकदा या रोबो टॅक्सी आपत्कालीन मार्गात अडथळा उत्पन्न करतात. या स्वयंचलित गाडय़ांचा अनेकदा त्यांच्या मुख्य केंद्राशी संपर्क तुटल्याने मार्गातच थांबतात अथवा दिशाहीन होतात आणि त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते हा विरोधकांचा मुख्य आक्षेप आहे, तर मानव चालवत असलेल्या वाहनांपेक्षा या रोबो टॅक्सी अधिक सुरक्षित आहेत आणि मुख्य म्हणजे दिव्यांग किंवा वृद्ध व्यक्तींसाठी त्या आरामदायी आणि सोयीच्या आहेत असा समर्थकांचा दावा आहे. आता या निर्णयाविरोधात तेथील स्थानिक अधिकाऱयांनी दाद मागितली असून हा आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे.
‘एआय’सारख्या एकाच प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेला एक रोबो डॉग लोकांचे प्रचंड कौतुक आणि प्रेम मिळवत असताना त्याच तंत्रज्ञानावर आधारलेली रोबो टॅक्सी विरोधाचा सामना करीत आहे. खरे तर या दोन्ही गोष्टी मानवाच्या सोयीसाठी बनवलेल्या आहेत. रोबो टॅक्सीच्या विरोधामागे लोकांच्या मनातील ‘एआय’विरुद्धची सुप्त भीती हे प्रमुख कारण असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. जगभरात ‘एआय’विरुद्ध अनेक सूर उमटत आहेत. भविष्यात रोबोटस् प्रत्येक मानवी नोकरी ताब्यात घेतील आणि एक काळ असा येईल की, लाचार झालेला मानव त्यांचा गुलाम होईल असे वाटणारेदेखील काही तज्ञ विविध देशांत आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील 72 टक्के लोक भविष्यात Aघ् तंत्रज्ञान नोकऱयांवर परिणाम करणार या चिंतेत आहेत, तर 60 टक्के लोक पुढील पन्नास वर्षांत ‘एआय’ तंत्रज्ञान जवळपास सर्व उद्योगधंद्यांतील नोकऱया ताब्यात घेणार यावर ठाम आहेत. जगभरातील प्रमुख देशांतील तपास संस्था ‘एआय’च्या दुरुपयोगामुळेदेखील धास्तावलेल्या आहेत. येणारा काळ ‘मानव विरुद्ध रोबोट’ असा ठरण्याची दाट शक्यता आहे.