प्रशांत परिचारक यांची माघार, पंढरपूर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर अर्बन को-ऑप. बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेत परिचारक यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, विरोधी समविचारी आघाडीने केलेले अपील सहायक निबंधक पुणे यांनी फेटाळून लावल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीत दिलीप धोत्रे व सहकाऱ्यांनी समविचारी आघाडी स्थापन करून परिचारक गटाला आव्हान दिले होते; परंतु त्यांचे सर्वच्या सर्व 18 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले होते. यामुळे त्यांनी सहायक निबंधक, पुणे यांच्याकडे अपील केले होते. मात्र, तेथेही विरोधकांचे अपील फेटाळून लावले आहे. उमेदवारी अर्ज बुधवारी नामंजूर करण्यात आले. दरम्यान, 12 जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. सत्ताधारी परिचारक गटाने 17 जागांसाठी 18 अर्ज दाखल केले होते. गुरुवारी सकाळी प्रशांत परिचारक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे परिचारक गटातील कार्यकर्त्यांसह विरोधकांनीही आश्चर्य व्यक्त केले.

प्रशांत परिचारक यांचे चुलतबंधू राजाराम परिचारक यांचा संचालक मंडळात समावेश आहे. त्यांना प्रथमच बँकेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात 31 शाखा असून, 2 हजार 900 कोटींची उलाढाल आहे. 110 वर्षांची ही बँक सोलापूर जिल्ह्यात नामांकित म्हणून परिचारक गटाचे आता 17 जागांसाठी सतराच अर्ज शिल्लक आहेत. यात राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, गजेंद्र माने, अनिल अभंगराव, माधुरी जोशी, डॉ. संगीता पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, काही वेळा थांबणे ही गरज बनते. 2002 मध्ये दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी बँकेत सेवेची संधी दिली. 20 वर्षांनंतर आता नवीन युवकांना संधी देऊन संस्था भविष्यात वाढली पाहिजे, टिकली पाहिजे. यासाठी नवीन पिढी तयार झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त होत आहे. तसेच, आपल्या राजकीय जीवनाचा संस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशांत परिचारक यांनी नमूद केले आहे.