
सामना ऑनलाईन । मुंबई
टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये आता मुंबईकर माजी कसोटीपटू आणि मधल्या फळीतील नामवंत फलंदाज प्रवीण अमरे यांनीही उडी घेतली आहे. नुकताच त्यांनी या पदासाठीच्या आपला अर्ज हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला पाठवला आहे.अमरे यांची फलंदाजी क्षेत्रातील प्रतिभा आणि कारकिर्दीतील यशस्वी कामगिरी पाहता ते या पदासाठीचे तगडे उमेदवार मानले जात आहेत.
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी वर्षभर हिंदुस्थानी संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्न कायम होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात आघाडीचे 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजी पार कोलमडली होती. प्रविण अमरे यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलं असून, आयपीएलमध्येही ते दिल्लीच्या संघाला मार्गदर्शक म्हणून काम पाहतात.
अमरेंच्या शिष्यांची यादी मोठी
हिंदुस्थानी कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे हा नेहमी प्रविण अमरे यांच्याकडून टिप्स घेत असतो. याव्यतिरीक्त आमरे यांनी सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंनाही फलंदाजीचे धडे दिले आहेत. अमरे यांच्या शिष्यांची यादी तशी मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात अमरे फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी संजय बांगर यांना कशी लढत देतात हे पाहणं कुतूहलाचे ठरणार आहे.






























































