
ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या त्यांना पद्मविभूषण आणि ज्यांनी गोळ्या झेलल्यामुळे भाजपचे सरकार आणि राम मंदीर बनले त्यांच्या वाटेला उपेक्षा आली असल्याची खंत हिंदुत्ववादी नेते आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी व्यक्त केली आहे. धर्मासाठी काम करणारी मंडळी ज्या देशात उपेक्षित असतात त्या देशाचे कधीही कल्याण होत नाही असे ते म्हणाले. या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, गोरखपीठाधीश महंत अवैद्यनाथ, अयोध्येतील महंत रामचंद्र परमहंस आणि कोठारी बंधू यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी केली आहे. ते यवतमाळमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मंदिराचे खरे श्रेय या सगळ्यांना जात असल्याचेही ते म्हणाले. या पाच जणांव्यतिरिक्त रा मंदिराचे श्रेय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही असे तोगडियांनी म्हटले. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे भाजप सरकार तसेच राम मंदिर बनले ज्यामुळे त्यांना भारतरत्न देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ऋणमुक्ती मिळवावी असे तोगडिया यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानवर गरज पडल्यास क्षेपणास्त्रे सोडा!
पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत आहे . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानाचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली यांच्यामध्ये एक करार झाला होता. या करारानुसार पाकमध्ये जर अत्याचार झालेत तर भारत पाकिस्तानातील हिंदूंच्या पाठीशी उभा राहील असं या करारात नमूद करण्यात आले होते . जर पाकिस्तान ऐकत नसेल तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पाकिस्तानावर दबाव आणण्यासाठी भारतातून पाकिस्तान मध्ये जाणाऱ्या नदीचे पाणी अडवावे आणि तरीही ते ऐकत नसतील तर पाकिस्तानावर क्षेपणास्त्रे सोडावीत अशी मागणीही प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.