
मुलुंडमधील एका 40 वर्षीय गर्भवती महिलेवर सी-सेक्शनची शस्त्रक्रिया आणि ब्रेन टय़ूमरसाठीची डिकप्रेशन क्रॅनिओटॉमी एकाच वेळी केल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
या गर्भवती महिलेला तिसऱया महिन्यात आपल्या शरीराची उजवी बाजू अशक्त झाल्याचे जाणवले. फोर्टिस हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ञ डॉ. अतुल गणात्रा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही तपासण्या केल्या. त्यात या महिलेला मेनिन्जिओमा (एक प्रकारचा ब्रेन टय़ूमर)असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना डॉ. अजय बजाज यांच्याकडे न्यूरोलॉजिकल तपासणीसाठी पाठविले. या स्थितीमध्ये कवटीच्या आत असलेल्या मेंदू व मणक्याच्या भागाला आच्छादणाऱया अंतःपटलावर टय़ूमर तयार होतो.
डॉक्टरांनी महिलेची तत्काळ प्रसूती करण्याचा व मेंदूवरील दाब काढण्यासाठी डिकप्रेशन प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला. डॉ. गणात्रा आणि डॉ. बजाज यांनी अचूक मेळ साधत या शस्त्रक्रिया केल्या. प्रसूतीनंतर दोन दिवसांनी या महिलेचा रक्तदाब स्थिर झाल्यानंतर टय़ूमर शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला. या महिलेला प्रसूतीनंतर 7-8 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.

























































