खारकोपर लोकल इफेक्ट, उलवेला घर घेण्यासाठी पहिली पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

सर्वसामान्यांना परवडणारी घरे तर श्रीमंतांसाठी सेकंड होमचा उत्तम पर्याय अशी आतापर्यंत ओळख असलेल्या उलवेतील रिअल इस्टेटचा व्यवसाय नेरुळ-खारकोपर लोकलसेवा सुरू होताच आणखी जोर धरू लागला आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रतिचौरस फूट चार ते सहा हजार रुपये असणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये थेट दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. जागेचे भाव वधारले असले तरी नवी मुंबईपेक्षा कमी किमतीत घरे मिळत असल्याने मध्यमवर्गीयांची पावले उलव्यात घरे घेण्यासाठी वळली आहेत, तर दुसरीकडे आज ना उद्या रेल्वेसेवा सुरू होईल, या अपेक्षेने उलव्यात आधीच स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचा वनवास संपला असून नोकरीधंद्यासाठी नेरुळ, उरण अशी तारेवरची कसरत आता कायमची थांबली आहे.

मुंबईतून हद्दपार होत असलेला क मोठय़ा घरांचे स्वप्न घेऊन जगणारा मध्यमवर्गीय माणसाला खासकरून तरुणाईला उलवे हे आपले हक्काचे ठिकाण वाटले. त्यातच सिडकोच्या परवडणाऱ्या घरांनी त्यांना आकर्षित केले. मात्र परवडणारे घर मिळाले असले तरी हाल संपले नव्हते. मुंबईतून दमून-भागून आल्याकर तासन तास नवी मुंबईच्या बसमधून प्रवास करून त्यांना आपले घर गाठावे लागत होते. नेरुळ स्थानकातून सर्वाधिक उलवे येथे जाणाऱ्या नागरिकांच्या रांगा लागत होत्या. त्यांच्या सोयीसाठी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बसेसच्या फेऱ्या जास्त असल्या तरी 20 ते 30 मिनिटांनी बस येत असल्याने उलवेवासीयांना ताटकळत उभे राहावे लागत होते. याचा सर्वाधिक त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत होता, त्यामुळे उलव्यात घर घेऊन चूक तर केली नाही ना, असा पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली होती, तर दुसरीकडे दळणवळणाची सुविधा नसल्याने रिअल इस्टेटचा धंदाही थंडावला होता, पण नेरुळ-खारकोपर लोकल सुरू होताच उलवेवासीयांचे हाल संपलेच. सोबत रिअल इस्टेटच्या बिझनेसनेही उसळी मारली आहे.

परवडणाऱ्या घरांचे नेक्स्ट डेस्टिनेशन

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, कामोठे, खारघर या भागातील घरांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामानाने उलवेतील घरे सर्वसामान्यांसाठी परवडेबल आहेत. तसेच नवी मुंबईत 10 ते 15 हजार रुपये भाडय़ाने मिळणारी घरे येथे केवळ सहा ते सात हजार रुपयांमध्ये मिळत असल्याने घरांसाठी उलवे नेक्स्ट डेस्टिनेशन ठरत असल्याची माहिती येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते संजय पाथरे यांनी दिली.

रिक्षावाल्यांना दणका, एनएमएमटीला फटका

उलवेवासीयांसाठी खारकोपर व बामणडेंगरी स्थानक सोयीचे ठरत असल्याने लोकलसेवा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून या स्थानकांमध्ये गर्दी वाढू लागली आहे, त्यामुळे एनएमएमटीला मात्र फटका बसला आहे. नवी मुंबई महापालिकेला नेरुळ-उलवे फेऱ्यातून चांगला नफा मिळत होता. मात्र आता त्यावर पाणी सोडावे लागणार आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षावाल्यांनाही दणका मिळाला आहे.