मंदीर परिसरातील गहू विकायला गेलेल्या पुजाऱ्याकडे प्रभू श्रीरामाचे आधार कार्ड मागितले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात एक विचित्र प्रकरण घडलं आहे. इथल्या बांदा जिल्ह्यात राम जानकी मंदीर आहे. या मंदिराच्या पुजाऱ्यांनी आरोप केला आहे की उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रभू श्रीरामाचे आधारकार्ड मागितले. हे आधार कार्ड नसेल तर तुम्ही गहू विकू शकणार नाही असे सौरभ शुक्ला नावाच्या या अधिकाऱ्याने पुजाऱ्यांना सांगितल्याचं या पुजाऱ्यांनी म्हटले आहे. हे मंदीर अतर्रा तहसील क्षेत्रातील कुरहारा गावात आहे. या मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या नावे 7 हेक्टर जमीन असून, धान्य खरेदीसाठी ज्याच्या नावावर जमीन आहे त्याचं आधारकार्ड हवं असा सरकारी नियम असल्याचं सरकारी अधिकारी शुक्ला यांनी पुजाऱ्यांना सांगितले आहे.

महंत रामकुमार दास हे या मंदीराचे मुख्य संरक्षक आणि पुजारी आहेत. मंदिराच्या जमिनीतून जो गहू पिकतो तो विकून मिळालेला पैसा हा मंदिराच्या देखभालीसाठीच वापरला जातो. दरवर्षीप्रमाणे महंत दास गहू सरकारी धान्य खरेदी केंद्रावर गेले होते, यावेळी त्यांना आधार कार्ड विचारण्यात आले. ते नसल्याने ई-पोर्टलवर गहू खरेदीसाठी करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात आली असा आरोप महंत दास यांनी केला आहे. यावर्षी गहू विकायचा असेल तर प्रभू श्रीरामाचे आधार कार्ड लागणार असल्याने महंत दास चिंतेत पडले आहेत. आधार कार्ड बनविण्यासाठी प्रभू श्रीरामाच्या बोटांचे ठसे कसे आणायचे, आधार कार्डासाठी प्रभू श्रीरामाचा मोबाईल नंबर कुठून आणायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. गेल्या वर्षी सरकारी धान्य खरेदी केंद्रावर आपण 150 क्विंटल (जवळपास 15 हजार किलो) गहू विकला असल्याचं महंत दास यांनी सांगितलं आहे. मंदिर परिसरातील धान्य दरवर्षी सरकारी धान्य खरेदी केंद्रावरच विकत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद उपाध्याय यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटले की मठ आणि मंदिरांनी पिकवलेले धान्य खरेदी करू नये असे स्पष्ट आदेश आहेत. धान्य खरेदीसाठी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी आधार कार्ड गरजेचं आहे. उपविभागीय दंडाधिकारी सौरभ शुक्ला यांनी या प्रकरणाबाबत बोलताना म्हटले की महंत दास यांना प्रभू श्रीरामाचे आधार कार्ड मागितले नव्हते, त्यांना प्रक्रिया काय आहे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे समजावून सांगण्यात आले होते.