
जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवकांना मानधनवाढ, रिक्त पदांची भरती, एमएससीआयटीला मुदतवाढ द्यावी, या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या मागण्यांबाबत सकारात्मकपणे विचार करण्यची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी सांगली दौऱयावर होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात समितीचे राज्याचे अध्यक्ष उदय शिंदे, सल्लागार विश्वनाथ मिरजकर, राज्य संघटक सयाजी पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, किरण गायकवाड, सांगली बँक चेअरमन यू. टी. जाधव, शशिकांत भागवत, सातारा बँकेचे संचालक किरण यादव, सांगली बँक माजी चेअरमन शशिकांत भजबळे यांचा समावेश होता.
सातव्या वेतन आयोगातील शिक्षक वेतन निश्चितीच्या त्रुटी, बक्षी समिती खंड-2, पूर्वाश्रमीच्या वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न, आंतरजिल्हा बदली पोर्टल सुरू करणे, 10 टक्के रिक्त जागा अट रद्द करून आंतरजिल्हा बदली टप्पा 5वा सुरू करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्यांना कार्यमुक्त करणे, संचमान्यता निकष दुरुस्ती, जिल्हांतर्गत बदली आदेशात दुरुस्ती करून प्रक्रिया पार पाडणे, केंद्रप्रमुख भरतीची जून 2014 अधिसूचना रद्द करून सर्व रिक्त जागा शिक्षकांतून 100टक्के भराव्यात या अशा 35 मागण्यांचाही या निवेदनात समावेश आहे.
पूरग्रस्तांसाठी शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी राज्यातील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन देण्यात येईल असे राज्य शिक्षक समितीच्या वतीने जाहीर करण्यात आल्
असे मुख्यमंत्री पाहिले नाहीत!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या भेटीविषयी शिक्षक समितीचे मार्गदर्शक विश्वनाथ मिरजकर अत्यंत भावूक होत या भेटीचा अनुभव कथन केला. आम्ही समितीच्या वतीने आमच्या मागणीसाठी अनेकांची भेट घेतो, निवेदन देतो, अनेक अधिकारी, मंत्री खुर्चीत बसून निवेदन घेतात. मात्र, आमचे शिष्टमंडळ भेटले तेव्हा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी ओळख करून दिली. शिक्षक आहेत हे समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्चीतून उठून निवेदन घेतले. सविस्तर म्हणणे ऐकून घेतले. मुख्यमंत्रीपदावर असूनही शिक्षकांविषयी असणारा आदरभाव दिसून आला. आम्ही आजपर्यंत असे सुसंस्कृत, विनयशील मुख्यमंत्री पाहिले नाहीत. त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढल्याचे त्यांनी सांगितले.























































