
खरातला महान करण्यात ‘तेव्हाच्या’ मुख्यमंत्र्यांचा वाटा होता, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच पंतप्रधान मोदींनी रॉकेलची टूम काढल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असा घणाघातही त्यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, भारताचे बाहेर मित्र नाहीत. जे मित्र होते ते आपण गमावलेले आहेत. अशा वेळेला मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतंय, पण यासाठी 27 दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झालं, त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच त्यांनी सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती. त्या बैठकीला त्यांनी स्वतः उपस्थित राहायला हवं होतं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत, त्यांच्याशीही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. आपण देशाचे नेते आहात, आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात. पण आज तुम्ही या देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय. 3 लिटर रॉकेल हे अंधभक्तांसाठी तीर्थच आहे. मोदी तीन लिटर रॉकेल देत आहेत, हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे. पण या देशातली सामान्य, गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेलाही आता पुढे तीन लिटर रॉकेलवर गुजराण करावी लागत असेल, तर देशावर ही परिस्थिती आणि अवकाळा फक्त मोदींच्या राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे निर्माण झाला आहे असेही संजय राऊत म्हणाले.
खरात आता तुरुंगामध्ये आहेत. दुसरे कोणी असे बुवा महाराज असतील, त्यांनी राज्यामध्ये काय चाललंय ते समजून घ्यावं. देशभरामध्ये लोक रांगेत उभे आहेत आणि मोदींनी ही भीती निर्माण केली. तुम्ही रॉकेलची टूम का काढली? तुम्ही रॉकेलची टूम काढल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. चीन आणि फ्रान्स सारख्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साधारण चार महिन्यांचा साठा आहे. आणि आपल्याकडे एक आठवड्याचाही साठा उरलेला नाही, ही माझी माहिती आहे. तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
आता काही जहाजे आपली होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुटलेली आहेत. चार जहाजे इराणच्या कृपेने सुटली आहेत. त्यामुळे थोडी परिस्थिती बदललेली आहे. यामध्ये भारताची डिप्लोमसी नसून, इराणने भारतीयांबाबत दाखवलेली संवेदना आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले.
बुवा बाजीला प्रतिष्ठा नामवंत लोकच देतात. सामान्य माणूस बुवाबाजीला प्रतिष्ठा देत नाही. सत्ताधारी, राजकारणी, उद्योगपती, मंत्री-संत्री, आमदार, खासदार हेच अशा भोंदूगिरीला प्रतिष्ठा देतात. त्यांचं तिथे जाणं-येणं वाढतं, पूजा विधी वाढतात. त्यामुळे या बुवांना प्रतिष्ठा मिळते. आणि यामध्ये एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. समाजजीवनावर हा सर्वपक्षीय अत्याचार आहे. ज्या विषयांवर मी विश्वास ठेवत नाही—बुवाबाजी, भोंदूगिरी, अंधश्रद्धा—त्यावर मी कधी बोलत नाही. पण शिंदे किंवा फडणवीस, आपण राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी अशा भोंदू बाबांच्या नादाला लागू नये, हे मी म्हणतो. हे जे कोणी खरात बाबा आहेत, त्यांना महान बनवण्यात सध्याच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा, आधीच्या मुख्यमंत्र्यांचा वाटा आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
जे संविधानिक पदावर बसले आहेत, ज्यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे, त्यांनी अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि लोकांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. आपण ज्या राज्याचे नेतृत्व करतो आहोत, तो महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आपण आपल्या भिंतीवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावता, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ढोंगबाजीला लाथ मारली आहे असेही संजय राऊत म्हणाले.






























































