मोदींना दीड लाखाची लाच घेताना पकडले, शिक्षकांनी वाटले पेढे ..!

50

सामना ऑनलाईन । परळी

पंतप्रधान मोदींची “न खाऊंगा ना खाने दुंगा” ही घोषणा मोदींनीच खोटी ठरवली आहे. मात्र हे ते मोदी नाहीत, हे आहेत बीडमधल्या परळीच्या एका शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी. परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या महाशयांनी लिपिकाची बाजू मांडण्यासाठी त्याच्याकडे दोन लाखांची लाच मागितली होती, यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या लाचखोर मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या मोदींच्या जाचाला कंटाळलेल्या शाळेतील शिक्षकांनी कारवाई बद्दल आनंद व्यक्त करत पेढे वाटले आहेत.

परळीच्या वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची 2012 साली नियमबाह्य नेमणूक झाल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्याने ही चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी करत आहेत. या चौकशीत बाजू मांडण्यासाठी मुख्याध्यापक मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच रक्कम न दिल्यास सेवामुक्त करून पूर्वीच्या लिपिकाला पुन्हा सेवेत रुजू करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे संबंधीत लिपीकाने या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून शनिवारी मोदी याला पेठ गल्ली परिसरात दीड लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले.

आरोपी मुख्याध्यापक मोदी याची सेवानिवृत्ती अवघी सहा महिन्यांवर आली होती, तसेच वैद्यनाथ माध्यमिक विद्यालय संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्याध्यापक लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याने परळी शहरात खळबळ उडाली आहे. मात्र मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याच्या जाचाला कंटाळलेल्या शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईचे स्वागत करत पेढे वाटून आनंदात साजरा केला.

आपली प्रतिक्रिया द्या