कळंबा मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गांजा, मोबाईल सापडण्यासह कैद्यांमध्ये होणाऱया हाणामारीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात आता कैद्याने चक्क कारागृह अधीक्षकांवरच जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज समोर आली आहे. कारागृहात बराकीची पाहणी करीत असताना कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्यावर संजय श्रीबेणीमाधव मिश्रा (वय 48) या कैद्याने पत्र्याच्या एका तुकडय़ाने हल्ला केला. यात इंदूरकर जखमी झाले आहेत.

अधीक्षक इंदूरकर यांच्या प्रसंगावधानामुळे गळ्यावर होणारा वार हातावर झाला. इंदूरकर यांच्या तक्रारीवरून हल्लेखोर कैद्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉचमन पदावरून काढल्याच्या रागातून कैद्याने हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह अधीक्षक इंदूरकर हे इतर अधिकाऱयांसह सकाळी नेहमीप्रमाणे कारागृहातील बराकची तपासणी करीत होते. या वेळी संशयित कैदी संजय श्रीबेणीमाधव मिश्रा याने अचानक त्यांच्यावर एका पत्र्याच्या तुकडय़ाने हल्ला केला. इंदूरकर यांनी प्रसंगावधान राखत कैद्याचा हल्ला हातावर झेलला, तर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य कर्मचाऱयांनी कैद्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. हल्ल्यात जखमी झालेले इंदूरकर यांच्यावर कारागृहातील वैद्यकीय कक्षात उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच इंदूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित कैद्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वॉचमन पदावरून हटविल्यामुळे हल्ला

कैदी संजय मिश्रा हा रत्नागिरीहून सप्टेंबर 2021 मध्ये कळंबा कारागृहात आला होता. त्याच्याकडे वॉचमनचे काम दिले होते. यादरम्यान दुसऱया कैद्याला मारहाण केल्याने त्याला वॉचमन पदावरून हटविण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून त्याने थेट कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.