
सामना प्रतिनिधी । हदगांव
कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे भूखंडाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी रेखांकन करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यांना हरीसिंग राठोड व त्यांच्या कुटूबियांनी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना अटक केली होती. आज दुपारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉ. पावडे यांनी हरीसिंघ राठोड यांना मृत घोषित केले.
मागील पाच वर्षापासून हदगांव बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती आहे. या कालावधीत बाजार समितीच्या भुखंडावर अनेकांनी अतिक्रमण केले असल्यामुळे बाजार समितीच्या नवनियुक्त संचालक मंडळाने ठराव घेऊन संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी या कामाला सुरूवात करण्यात आली होती. कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या बाजूलाच असलेल्या तांड्यातील रहिवाशी हरीसिंग संघा राठोड यांना शासनाकडून उपजिवीकेसाठी सरकारी गायरान जमीन पंचवीस वर्षापूर्वी तत्कालीन तहसीलदारांनी दिली असल्यामुळे हरीसिंग राठोड यांनी सुमारे तीन वर्षापुर्वी बाजार समितीच्या जागेवर ताबा घेतला.
बाजार समितीच्या प्रशासक व कर्मचार्यांनी शासनाने दिलेली जमीन ही नसून कागदपत्रांमधील चतु:सिमे प्रमाणे जिथे जमीन दिलेली असेल त्या ठिकाणी ताबा करावा असे सांगितले परंतू राठोड यांनी ताबा सोडला नाही. त्यामुळे बाजार समितीच्या वतीने प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा निवाडा मागील वर्षी लागला. यात सदर भूभाग हा कृषी ऊत्पन्न बाजार समितीचा असल्याचा निवाडा दिल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले होते. दरम्यान बाजार समितीची निवडणूक होऊन नविन संचालक मंडळ अस्तित्वात आले. संचालक मंडळाने ठराव घेवून सर्व अतिक्रमण काढून संरक्षक भिंत करण्याचे काम सुरू केले होते. काल कामावरील कर्मचार्यांना कामात अडथळा आणून मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर तपास अधिकारी गणेश गायके यांनी काल सायंकाळी हरीसिंग राठोड यांना ताब्यात घेतले होते.
आज सकाळी नेहमी प्रमाणे सर्व दिनचर्या पार पडली होती. दुपारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे राठोड यांना हदगांवातील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तिथे उपस्थित डॉ. पावडे यांनी रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या प्रकरणी वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकट ढगे यांनी सांगितले की शवविच्छेदन होईपर्यंत नेमका कशामुळे मृत्यू झाला हे सांगता येणार नाही. वैद्यकीय अधिकार्यांच्या टिमकडून ईन कॅमेरा शव विच्छेदन केले जाणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.



























































