
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
प्रदूषण, अन्न भेसळ, ग्लोबल वार्ंमग, धोकादायक ई-कचरा, सुपीक शेतजमिनीचा अभाव, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर व ऱ्हास, वृक्षतोड, जंगलांचा नाश, वन्यजीव आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष, इंधनाचा वाढता वापर, कधी दुष्काळ, कधी पूर, स्वच्छ हवा आणि पाण्याचा अभाव, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढती काँक्रीटची जंगले, बेरोजगारी, भूक, महागाई, जीवनसंघर्ष आणि वाढते गंभीर आजार या सर्व समस्यांचे कारण वाढती लोकसंख्या आहे.
जगाची लोकसंख्या 1 अब्ज होण्यास हजारो वर्षे लागली, नंतर केवळ 200 वर्षांत ती सात पटीने वाढली. विसाव्या शतकाच्या मध्यापासून जगाने अभूतपूर्व लोकसंख्या वाढ अनुभवली आहे. 1950 ते 2020 दरम्यान जगाची लोकसंख्या तिपटीने वाढली आहे. 2011मध्ये जागतिक लोकसंख्या 7 अब्जांवर पोहोचली आणि 2021मध्ये ती सुमारे 7.9 अब्जपर्यंत वाढली. 2030मध्ये सुमारे 8.5 अब्ज, 2050मध्ये 9.7 अब्ज आणि 2100मध्ये 10.9 अब्ज इतकी वाढण्याची अपेक्षा आहे.
येत्या काही वर्षांत हिंदुस्थान जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होऊन चीनला मागे टाकणार आहे. देशात दरवर्षी सुमारे 1.60 कोटी लोकसंख्येची वाढ होत आहे, ज्यासाठी लाखो टन अन्नधान्य, 1.9 लाख मीटर कापड, 2.6 लाख घरे आणि 52 लाख अतिरिक्त नोकऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच नैसर्गिक आणि मानव निर्मित संसाधनांवर लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी दबाव पडतो. ज्या देशात मोठी लोकसंख्या दररोज 2 डॉलरपेक्षा कमी जगते तेथे वाढणारी लोकसंख्या अन्न सुरक्षेची परिस्थिती आणखी बिघडवेल. 2050पर्यंत, जगातील सुमारे 66 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहणार आहे. लोकसंख्या वाढीचा थेट परिणाम आर्थिक वाढ, रोजगार, उत्पन्न वितरण, गरिबी आणि सामाजिक सुरक्षिततेवर होतो. ते आरोग्य सेवा, शिक्षण, गृहनिर्माण, स्वच्छता, पाणी, अन्न आणि ऊर्जेवर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांवरदेखील प्रभाव पाडतात. युथ इन इंडिया – 2017च्या अहवालानुसार 1971 ते 2011 दरम्यान तरुणांची वाढ 168 दशलक्षवरून 422 दशलक्ष झाली आहे.
संयुक़्त राष्ट्रसंघ, आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग अंतर्गत, लोकसंख्या विभाग यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 8 जुलै 2022पर्यंत हिंदुस्थानची सध्याची लोकसंख्या 1,40,78,73,998 आहे आणि जगाची एकूण लोकसंख्या 7,95,91,50,845 आहे. जे नवीनतम संयुक्त राष्ट्र डेटाच्या वर्ल्डोमीटर तपशीलावर आधारित आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17.7 टक्के आहे, परंतु जगातील गोड्या पाण्याच्या संसाधनांपैकी फक्त 4 टक्के आहे. एकूण जमीन क्षेत्र 2,973,190 चौ. कि.मी. आहे. म्हणजेच जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.4 टक्के हिस्सा हिंदुस्थानचा आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मते हिंदुस्थानातील सुमारे 14.8 टक्के (जवळपास 22.4 कोटी) लोकसंख्या कुपोषित आहे. हिंदुस्थानातील पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूंपैकी 69टक्के मृत्यू कुपोषणामुळे होतात. गरिबी हे कुपोषणाचे एक मूळ कारण आहे आणि गरिबी निर्मूलन अद्याप खूप दूर आहे. हिंदुस्थानातील 63 टक्के झोपडपट्टी घरे एकतर ड्रेनेज कनेक्शन नसलेली आहेत किंवा उघड्या नाल्यांना जोडलेली आहेत. जगातील अविकसित देशांप्रमाणे हिंदुस्थानातही अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांना जगण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाही. एवढेच नाही तर त्यांना मिळणाऱ्या अन्नातही पोषक तत्त्वांचा अभाव असतो. प्यू रिसर्च सेंटरने अहवाल दिला होता की, हिंदुस्थानातील जे लोक दररोज 150 रुपये कमवू शकत नाहीत (खरेदी शक़्तीवर आधारित उत्पन्न) त्यांची संख्या गेल्या एका वर्षात झपाट्याने वाढली आहे. अशा लोकांची संख्या एका वर्षात सहा कोटींनी वाढली असून एकूण गरिबांची संख्या 134 दशलक्ष झाली आहे.
116 देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्स 2021मध्ये हिंदुस्थान 2020मध्ये 94व्या स्थानावरून 101व्या स्थानावर घसरला आहे. हिंदुस्थान आपल्या बहुतेक शेजाऱ्यांपेक्षा मागे आहे. पाकिस्तान 92व्या, नेपाळ 77व्या, बांगलादेश 76व्या आणि श्रीलंका 65व्या स्थानावर आहे. गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ऑक्सफॅम या संस्थेच्या म्हणण्यानुसार जगभरात दर मिनिटाला 11 लोक भुकेने मरतात. संयुक़्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या 2021च्या अन्न कचरा निर्देशांक अहवालानुसार हिंदुस्थानात घरगुती अन्नाचा कचरा दरवर्षी 50 किलो किंवा देशभरात एकूण 68,760,163 टन इतका असल्याचा अंदाज आहे. यूएनईपीच्या अहवालानुसार 2019मध्ये अंदाजे 931 दशलक्ष टन अन्न वाया गेले. गेल्या पाच वर्षांत 38,000 मेट्रिक टनांहून अधिक अन्नधान्य वाया गेल्याचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने उघड केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न सुरक्षा आणि पोषण स्थिती 2022 अहवालात म्हटले आहे की, 2021मध्ये जगभरात भुकेने ग्रस्त लोकांची संख्या 828 दशलक्ष झाली आहे.
प्रदूषण, अन्न भेसळ, ग्लोबल वार्ंमग, धोकादायक ई-कचरा, प्रदूषित हवा-पाणी, सुपीक शेतजमिनीचा अभाव, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर व ऱ्हास, वृक्षतोड, जंगलांचा नाश, वन्यजीव आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष, इंधनाचा वाढता वापर, कधी दुष्काळ, कधी पूर, स्वच्छ हवा आणि पाण्याचा अभाव, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढती काँक्रीटची जंगले, बेरोजगारी, भूक, महागाई, जीवनसंघर्ष आणि वाढते गंभीर आजार या सर्व समस्यांचे कारण वाढती लोकसंख्या आहे. जास्त लोकसंख्या म्हणजे अधिक गरजा. आजही आपल्या समाजातील अनेक असहाय्य लोक, भिकारी, आजारी, हतबल लोक, असहाय मुले रस्त्यावरील कचरा, खराब झालेल्या अन्नाच्या ढिगाऱ्यातून अन्न निवडताना दिसतात, ही आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. लोकसंख्या वाढीमुळे झोपडपट्ट्या, घाणेरडे वातावरण, निरक्षरता, गरिबी, अपुरे पोषण, योग्य संगोपनाचा अभाव, आर्थिक विषमता अशा गंभीर समस्या आहेत.
आज हिंदुस्थान जगातील सर्वात मोठी युवा शक्ती असलेला देश म्हटला जातो. युवकांना योग्य साधनसंपत्ती, रोजगार, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवा, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य नियोजन आणि सर्वांना समान संधी मिळाल्या तर युवाशक्ती देशाला महाशक्ती बनवू शकते अन्यथा ही युवाशक्ती बेरोजगारी, महागाई, गरिबी, साधनांची कमतरता यामुळे चुकीच्या दिशेने वाटचाल करेल आणि समाजासमोरील समस्या वाढवेल. आज आपल्या देशात अशी समस्या सामान्य झाली आहे, तरुणांमधील गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. श्रीमंत माणसाला वेळ नाही, गरीब माणूस दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करण्यात धडपडत आहे, कुणी जबाबदारीने तर कुणी मजबुरीने बांधलेले आहे. आधुनिकतेची उधळण प्रत्येकावर पडली आहे. आता लहान मुलांकडूनच नाही तर वडीलधाऱ्यांकडूनही संस्कारांची अवहेलना केली जात आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर, ते मूल सुसंस्कृत नागरिक होईपर्यंत त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी पालकांची असते, मुलांचे भविष्य पालकांच्या हातात असते. आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. मुलांच्या जन्मापूर्वी पालकांनी त्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे.






























































