प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दादरमधील प्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली (86) यांचे निधन झाले. आजारपणामुळे ते हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. उपचारादरम्यान बुधवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजीपार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

वडिलांच्या आग्रहाखातर ते हॉटेल व्यवसायात उतरले होते. त्यांच्या वडिलांचे मुंबईला नेहमी येणे-जाणे होते. ते दादरला राहायला आले आणि हे कुटुंब मुंबईकर झाले. त्यावेळी कुलवंतसिंह 11 वर्षांचे होते. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांशी त्यांची घट्ट मैत्री होती. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘मुंबई मेरी जान’ ही त्यांची बॉलीवूडच्या आठवणींवरील वृत्तपत्रातील लेखमाला अत्यंत गाजली होती.

पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यात असलेल्या भौन गावात कुलवंतसिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कॉन्ट्रक्टर होते. ते सहा-सात वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दादरमध्ये आल्यानंतर सुरुवातीला ते नाराज होते, परंतु हळूहळू ते मुंबईकर झाले. त्यांचे कुटुंब मूळचे सुकामेव्याच्या व्यवसायातले. परंतु त्यांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यातच त्यांनी जम बसवला. सुरुवातीला दहा-बाय दहाच्या गाळ्यात सुरू केलेल्या प्रीतमचा नंतर चांगलाच विस्तार झाला. बॉलीवूडमध्ये स्ट्रगल करणाऱया कलाकारांचा प्रीतमवर राबता असायचा. अनेक लग्नही प्रीतममध्येच जुळल्याचे कोहली सांगायचे. राज कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र, संजीव कुमार, जगजितसिंह अशा दिग्गजांचा त्यांना जवळून सहवास लाभला.