
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेत शिवसेनेशी गद्दारी केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यामुळे आता राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
शरद पवार यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले होते की, 2014 मध्ये भाजपने शिवसेना सोडल्यानंतर आम्हीपण काँग्रेस सोडू, आणि निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल, असे शरद पवार साहेबांनी भाजपसह आम्हाला सांगितले होते. भुजबळ यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची साथ सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुम्ही छगन भुजबळ यांची मुलाखत नीट ऐकली असेल तर त्यांनी त्यात एक गोष्ट सांगितली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, त्यांचे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण आधीच ठरलेलं होतं. आधी भाजपने शिवसेनेची साथ सोडायची, मग राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची साथ सोडायची. त्यांनी असं 2014 च्या निवडणुकीआधीच ठरवले होते. त्यामुळे आता तुम्ही काहीही कारणे सांगितली तरी त्याला काही अर्थ राहत नाही. त्या फुटीमुळे आघाडीचे नुकसान झाले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी फुटली नसती तर 2014 ला आघाडी सरकार आले असते, असेही चव्हाण यांनी सांगितले.

























































