500 रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी, खासगी प्रयोगशाळांतील दर पुन्हा कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱया कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. यामुळे आता कोरोना आरटीपीसीआर चाचणी 500 रुपयांत करता येणार आहे. त्याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे.

आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करून 4500 रुपयांवरून आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यापूर्वी सरकारने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांत सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये दर करण्यात आले होते. आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरून नमूना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वॉरंटाइन सेंटरमधील प्रयोगशाळेतून नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.

अँटिजेन, अँटिबॉडीज चाचण्यांचे दरही कमी

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपिड अँटिजेन, अँटिबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वतः प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी पेंद्रावरून अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटिबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.