खासगी प्राथमिक शाळांच्या महागाई भत्त्यात 189 टक्के वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांच्या महागाई भत्त्यात 189 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर शिक्षकांनी ही गोड बातमी मिळाली असून सदर महागाई भत्त्यातील वाढ ही नोव्हेंबर- 2021 च्या मासिक वेतनात देऊन डिसेंबरमध्ये बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहे.

शिक्षक व कर्मचारी यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू नाही. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर मिळणाऱया लाभांपासून आजही मुंबईतील सुमारे 4500 शिक्षक व कर्मचारी वंचित आहेत. असे असले तरीही जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या वतीने प्रमुख सल्लागार जितेंद्र जानावळे, अध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस संदीप परब, कार्याध्यक्ष सुनील सुर्वे, खजिनदार रामदास हंजनकर यांनी सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात केंद्र व राज्य सरकारच्या महागाई भत्त्याच्या वाढीव दराने वाढ मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता.

त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाने 189 टक्के वाढीव महागाई भत्त्याचे अधिकृत परिपत्रक जारी केले. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही गोड बातमी मिळाल्यामुळे शिक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.