प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये का गेली, केला मोठा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
आज जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवलेली प्रियांका चोप्रा हिलाही कधीकाळी तिच्या रंगावरून टीका सहन करावी लागली आहे. ती अमेरिकेत असताना तिच्या रंगावर टिप्पणी केली गेली होती.

एकेकाळी बॉलिवूडची देसी गर्ल ते ग्लोबल स्टार असा प्रवास करून करोडोंच्या मनावर राज्य करणारी प्रियांका चोप्रा. हॉलिवूडमध्येही तिने मोठे नाव कमावले आहे. प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन हॉलिवूडमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला होता. यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. एका मुलाखतीत प्रियांकाने हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित एक मोठे सत्य उघडकीस आणले आहे.

प्रियांकाने सांगितले की, ती हिंदी चित्रपटसृष्टीतील राजकारणामुळे नाराज होती. म्हणूनच तिला ब्रेक हवा होता. याबाबत कंगना राणौतने प्रियांकाला पाठिंबा दिला आहे. यावरून कंगनाने करण जोहर आणि बॉलिवूडच्या माफियांवर निशाणा साधला आहे.

डेक्स शेफर्डसोबत झालेल्या ‘आर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्ट शोमध्ये प्रियांकाला विचारण्यात आले की, कोणत्या कारणामुळे तिने अमेरिकेत कामे शोधायला सुरुवात केली आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना प्रियांका म्हणाली की, जेव्हा ती ‘सात खून माफ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती तेव्हा देसी हिट्सच्या अंजुला आचार्यने तिच्याशी एक म्युझिक व्हिडिओ आणि यूएसमध्ये करिअर करण्यासंदर्भात संपर्क साधला होता. त्याचवेळी प्रियांका बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती, कारण तेव्हा ती हिंदी चित्रपटसृष्टीच्या राजकारणाला वैतागली होती. म्हणूनच तिला ब्रेक हवा होता. या म्युझिक व्हिडियोमुळे प्रियांकाला बॉलिवूडमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली.

त्या म्युझिक व्हिडियोनंतर प्रियांकाला इंटरनॅशनल सिरिज क्वांटिकोमध्ये अभिनेत्री म्हणून काम मिळाले. तिने या मालिकेत साकारलेली भूमिका सुपरहिट ठरली. यानंतर तिला हॉलिवूडचे प्रोजेक्ट मिळू लागले. हळूहळू प्रियांका हॉलिवूडमध्ये जास्त आणि बॉलिवूडमध्ये कमी दिसू लागली. हॉलिवूडकडे वळल्यानंतर प्रियांका चोप्राचा ‘द स्काय इज पिंक’ हा हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता. आता लवकरच ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात काम करणार आहे. प्रियांकाचे अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्सचेही काम सुरू असून ते येत्या एप्रिल महिन्यात तिची भूमिका असलेला एक सिटाडेल शोही प्रसिद्ध होणार आहे.

प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये केलेल्या मोठ्या खुलाशानंतर कंगना राणौतने तिला पाठिंबा दिला आहे. कंगना आणि प्रियांकाने 2008 मध्ये आलेल्या फॅशन चित्रपटात एकत्र काम केले होते. कंगनाने प्रियांकाच्या वक्तव्यावर ट्विटरद्वारे म्हटले आहे की, प्रियांकाचे हिंदी चित्रपटसृष्टीविषयी असे म्हणणे आहे की, लोकांनी तिच्याविषयी षडयंत्र रचले, कारस्थाने केली, तिला वाळीत टाकले. यामुळे तिला हिंदुस्थानातील कामे सोडावी लागली. प्रत्यक्षात इथे नेमके कोणत्या टोळीबद्दल बोललं जातंय, हे सगळ्यांना माहित आहे. प्रसिद्धिमाध्यमांनी त्यावेळी करण जोहर आणि प्रियांका चोप्राच्या भांडणाच्या बातम्या अनेक वेळा प्रसिद्ध केल्या होत्या.