
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची हॉलीवूडमध्ये धूम सुरू आहे. तिने हॉलीवूड सिनेमांच्या शूटिंगचा धडाका लावला आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म इंडस्ट्रीत तिचा जम बसू लागलाय. नुकतंच प्रियांकाने पती निक जोनास याच्यासोबत ‘ऑस्कर’ पुरस्काराची नामांकन यादी घोषित केली होती. त्यानंतर आता तिला आणखी एक मोठी संधी मिळणार आहे.
लवकरच प्रियांका 74 व्या ब्रिटिश ऍकॅडमी फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन (बाफ्टा) ऍवॉर्ड सोहळ्यात उपस्थित राहणार आहे. तसेच ती नामांकने जाहीर करणार आहे.
बाफ्टा सोहळा 10 आणि 11 एप्रिल रोजी पार पडणार आहे. प्रियांका आणि अन्य सेलिब्रेटी या सोहळ्यात व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. प्रियांकाच्या हस्ते नवोदित कलाकाराला पुरस्कार दिला जाणार आहे. प्रियांकाने याबाबतची माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. सध्या प्रियांका पतीसोबत लंडन येथे राहते.
प्रियांकाच्या ‘द व्हाइट टायगर’ सिनेमाला ब्रिटिश ऍकॅडमी फिल्म ऍवॉर्डमध्ये दोन नामांकने मिळाली आहेत. या सिनेमात राजकुमार राव आणि गौरव आदर्श यांच्याही भूमिका आहेत. त्यापैकी गौरवला ब्रिटिश ऍकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्ससाठी नामांकन मिळालेले आहे.
























































