
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱयांच्या हत्याकांडामुळे देशभरात भाजपविरुद्ध संतापाची लाट उसळली असतानाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारची दंडेलशाही कायम आहे. मृत शेतकऱयांच्या पुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांना अडवून धक्काबुक्की केली. त्यांना अटक केली. यावेळी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना चांगलेच खडसावले. तुमच्याकडे कायदेशीर वॉरंट आहे का? नोटीस आहे का? तुम्ही हात तर लावून दाखवा, असे प्रियंका गांधी यांनी पोलिसांना खडेबोल सुनावले.
केंद्र सरकारच्या जाचक कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना शेतकरी काळे झेंडे दाखवून आंदोलन करीत होते. अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेकने शेतकऱयांच्या अंगावर गाडी घातली. त्यात आठ शेतकरी ठार झाले. 10 शेतकरी गंभीर जखमी झाले. लखीमपूर परिसरात आगडोंब उसळला. सोमवारीही येथे प्रचंड तणाव होतो. येथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी रविवारी रात्री उशिरा लखनौहून लखीमपूर खिरीकडे रवाना झाल्या होत्या. मात्र, सीतापूर येथे पोलिसांनी त्यांना सकाळी ताब्यात घेतले आणि अटक केली. काँग्रेस नेते दिपेंद्रसिंह हुड्डा यांनाही अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने व्हिडीओ ट्विट केला असून, यावेळी मुजोर उत्तर प्रदेश पोलिसांना प्रियंका गांधी खडसावताना दिसत आहेत. दिपेंदसिंह हुड्डा यांना पोलीस धक्काबुक्की करीत आहेत. यावेळी प्रियंका गांधी पोलिसांना म्हणाल्या, ‘मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना आम्हाला का अडवत आहात? वरिष्ठ अधिकारी किंवा एखाद्या मंत्र्याकडून अटक वॉरंट आणा. कायदेशीर वॉरंट, नोटीस दाखवा, मग मला बेडय़ा घालून घेऊन जा. मी आनंदाने तुमच्यासोबत येण्यात तयार आहे. वॉरंटशिवाय तुम्ही अटक करू शकत नाही. धक्काबुक्की करू शकत नाही. मला हात लावून तर दाखवा.’ यानंतर पोलीस अधिकाऱयांनी महिला पोलिसांना पुढे केले. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘मलाही कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे. कोणत्या कायद्याखाली कारवाई करत आहात हे कळले पाहिजे. नाहीतर तुमच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होईल.’
अहिंसेच्या मार्गाने लढून अन्नदात्याला विजयी करू
प्रियंका गांधी यांच्या अटकेनंतर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला माहितीये तू मागे हटणार नाहीस. तुझ्या हिमतीपुढे ते घाबरले आहेत. अहिंसक मार्गाने न्यायाची लढाई लढू. देशातील अन्नदात्याला विजयी करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
प्रियंकाची ‘गांधी’गिरी
लखीमपूरला जाणाऱया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. त्यानंतर डिटेन्शन रूममध्ये प्रियंका गांधी यांनी झाडू घेऊन साफसफाईला सुरुवात केली. त्यांच्या या ‘गांधीगिरी’चा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.





























































