‘एमएसएमई समाधान’ आणि फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऍड. शिवांगी झरकर

आपल्या देशात लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग (एमएसएमई) आहेत. हे उद्योग म्हणजे देशाच्या औद्योगिक विकासाचा कणा आहेत. मात्र अनेकदा या उद्योगांना मोठय़ा खरेदीदार कंपन्या आणि उद्योगांकडून ‘थकीत येणे रकमे’ची समस्या गंभीरपणे भेडसावते. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला अडथळा निर्माण होतो. या थकीत पेमेंटवर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘एमएसएमई समाधान’ हा मार्ग काढला आहे. त्या माध्यमातून अशा थकीत रकमांचे प्रश्न निकाली काढले जातात. या संपूर्ण प्रक्रियेविषयी…

‘एमएसएमई समाधान’मध्ये तक्रार कशी नोंदवावी?

1. ‘एमएसएमई समाधान’च्या पोर्टलवर जाण्यासाठी खालील लिंक ओपन करा.
https://samadhaan.msme.gov.in/MyMsme/MSEFC MSEFC_Welcome.aspx
2. वरील पोर्टलवर गेल्यावर या पर्यायाची निवड करा (Case filing for Entrepreneur / MSE units).
3. नंतर ‘एमएसएमई समाधान’मध्ये आपला उद्यम /उद्योग आधारकार्ड नंबर टाका
4. त्यानंतर तक्रारदाराचा पॅन किंवा GST नंबर टाकावा. त्याचप्रमाणे वर्क ऑर्डर आणि इन्व्हॉईसच्या pdf स्वरूपातील कॉपी जोडावी (जास्तीत जास्त 5 वर्क ऑर्डर आणि 5 इन्व्हॉईस आपण जोडू शकतो).
5. सर्वात शेवटची आणि महत्त्वाची पायरी म्हणजे वरील तक्रार दाखल करावी.
आपल्या देशात एमएसएमई उद्योगांना उद्योग विकासाचा कणा मानले जाते आणि याच औद्योगिक कण्याला कायदेशीररीत्या लवचिक ठेवून उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्यासंबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले ते म्हणजे ‘एमएसएमई समाधान’. एमएसएमई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघू किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना, जेणेकरून हे उद्योग उद्योगक्षेत्रात येऊन सन्मानाने व्यवसाय करतील. उद्योग / उद्यम आधारकार्ड हा तुमच्या उद्योगाचा आधार आहे, ज्याच्या माध्यमातून छोटय़ा उद्योगांना एक आधार आणि औद्योगिक प्लॅटफॉर्म मिळतो.

एमएसएमई उद्योगांसमोरील थकीत येणे रकमेचे आव्हान

एमएसएमई उद्योगांनी अगदी कमी वेळेत उद्योगक्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला मोलाचे योगदान दिले, परंतु सर्वात मोठी समस्या, जी प्रत्येक एमएसएमईला सतावते, ती म्हणजे खरेदीदाराकडून थकलेली बाकी रक्कम (Delayed Payment). एमएसएमई क्षेत्रात साधारणपणे सूक्ष्म, लघू आणि मध्यम स्वरूपाचे व्यवसाय येतात. हे उद्योग कमी भांडवल गुंतवणुकीवर सुरू झालेले असतात. त्यामुळे खेळते भांडवल अतिशय क्षुल्लक किंवा नगण्य असते. त्यात जर अशा उद्योजकांकडून वस्तू किंवा सेवा घेऊन इतर कंपनीने त्यांचे पेमेंट वेळेवर केले नाही, तर एमएसएमई उद्योगांना उद्योग चालवणे कठीण होते. बऱयाच वेळेला मोठय़ा कंपन्या, छोटय़ा उद्योगांना व्यावसायिक संधी देतात, परंतु जेव्हा त्यांना थकलेली रक्कम/ पेमेंट देण्याची वेळ येते तेव्हा विविध सबबी द्यायला सुरुवात करतात आणि पेमेंट उशिरा करतात. थकलेली रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे उद्योजकाकडे खेळते भांडवल कमी होते आणि उद्योग चालवणे कठीण. याच आव्हानांना उपाय म्हणून सुरू झाले ‘एमएसएमई समाधान’. ज्याचा उपयोग करून उद्योजक थकलेल्या बिलांच्या रकमांसाठी एमएसएमईकडे तक्रार करू शकतात आणि लवकरात लवकर थकलेल्या बिलांची रक्कम मिळवू शकतात.

एमएसएमईडी कायदा –

थकलेल्या पेमेंटस्च्या समस्यांना नजरेसमोर ठेवून एमएसएमईडी 2006 कायद्याच्या कलम 15 ते 24 मध्ये त्याची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून संबंधित थकलेल्या पेमेंटस्साठी उद्योजक एमएसएमईला थेट संपर्क करून ‘एमएसएमई समाधान’च्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतो.

‘एमएसएमई समाधान’ पोर्टल –

30 ऑक्टोबर 2017 पासून एमएसएमई मंत्रालयाने ‘एमएसएमई समाधान’ ई-पोर्टल सुरू केले जेणेकरून उद्योजक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तक्रार नोंदवू शकतो. जर कोणी उद्योजकांच्या वस्तू किंवा सेवा विकत घेत असेल आणि वेळेवर त्याचे पेमेंट करत नसेल तर उद्योजक ‘एमएसएमई समाधान’ पोर्टलच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतो.

एमएसएमईडी कायदा 2006 च्या कलम 16 प्रमाणे खरेदीदार जर थकलेली बिल रक्कम फेडण्यास असमर्थ ठरला तर त्याला चक्रवाढ व्याजाप्रमाणे थकलेली रक्कम दरमहा लगेच फेडावी लागते किंवा रिझर्व्ह बँकेने नमूद केलेल्या व्याजाच्या तिप्पट प्रमाणात फेडावी लागते.

‘एमएसएमई समाधान’मध्ये तक्रार करण्यापूर्वीच्या गोष्टी –

1) उद्योजकाचे उद्यम/ उद्योग आधारकार्ड असावे.
2) उद्यम/ उद्योग आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर असावा.
3) पॅनकार्ड आणि उएऊ क्रमांक असावा.
4) जास्तीत जास्त 5 वर्क ऑर्डर आणि 5 इन्व्हॉईस असावेत (कमीतकमी 3 वर्क ऑर्डर आणि 3 इन्व्हॉईस अनिवार्य आहेत).

एमएसएमई कारवाई कशी केली जाते?

1. एमएसएमईमध्ये तक्रार नोंदवल्यावर तक्रार क्रमांक मिळतो. त्याच्या क्रमांकाच्या आधारे तुम्ही तुमच्या तक्रारीची सध्याची स्थिती पाहू शकतात.
2. सर्व माहिती आणि तक्रार तसेच जोडलेल्या वर्क ऑर्डर आणि इन्व्हॉईसची तपासणी केली जाते आणि 90 दिवसांपर्यंत कन्सिलिएशन पद्धतीने मध्य साधून ही तक्रार सोडवली जाते, परंतु जर कन्सिलिएशन पद्धतीने उपाय नाही काढता आला तर आर्बिट्रेशन पद्धतीचा वापर करून निर्णय देऊन ऍवॉर्ड जाहीर करावा लागतो.
3. समोरच्या पक्षाला तीनवेळेला नोटीस पाठवून त्याच्या कडून काही प्रतिक्रिया नाही आली तर खरेदीदारावर कोर्टातर्फे कारवाई केली जाते.
4. जर खरेदीदार किंवा समोरच्या पक्षाला वरील कोर्टात अपील करायचे असेल तर त्याला आधी ऍवॉर्डच्या 75 टक्के रक्कम आधी भरावी लागते आणि नंतर अपील करावे लागते.
‘एमएसएमई समाधान’च्या माध्यमातून थकलेल्या बिलाच्या संदर्भातील तक्रार सोडवली जाते. सर्व उद्योजकांनी उद्यम कार्ड घेणे आवश्यक आहे. जर उद्यम कार्ड असेल तर तुम्ही ‘एमएसएमई समाधान’तर्फे थकलेली रक्कम परत मिळवू शकता.

www.advshivangi.com
(Founder of Law Fleeter Adv. Shivangi)